सरकारी जागांमध्ये ऑक्सिजन फिलिंग स्टेशन उभा करा! पृथ्वीराज चव्हाण यांची अधिकाऱ्यांना सूचना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढतच आहे. प्रशासनाकडून कोणती तयारी करण्यात आली आहे. तसेच काय अपेक्षित आहे? यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तथा रयत सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, उदय पाटील उपस्थित होते.

कराड तालुक्यात 12 हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सह्याद्री हॉस्पिटल, शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल, स्व.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड हॉस्पिटल, राजश्री हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, क्रांती सर्जिकल, कोयना हॉस्पिटल, सह्याद्री ऍग्री इंजिनिरिंग, देसाई हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल आदी हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सर्व हॉस्पिटलमध्ये एकूण 866 बेडची तयारी केली गेली असून सध्या 183 बेड उपलब्ध आहेत.

कराड तालुक्यातील तथा जिल्ह्यातील हॉस्पिटलला ऑक्सिजनचा तुटवडा भेडसावत आहे. यासाठी चव्हाण यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच कराडमधील काही हॉस्पिटलशी संपर्क साधून त्यांच्याकडे किती प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे याची माहिती घेतली. ऑक्सिजनचा साठा कमी आहे असे दिसल्यावर चव्हाण यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी तसेच अन्न व औषध विभागाच्या सचिवांशी संपर्क साधून जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत माहिती घेतली. जिल्ह्यासाठी 7 टँकर पाठविले जात आहेत अशी माहिती देण्यात आली. ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत यावर उपाय म्हणून सरकारी जागांमध्ये ऑक्सिजन फिलिंग स्टेशन उभा करण्याबाबत चर्चा झाली व तसा अहवाल द्यावा अश्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, प्रशासनासोबतच्या बैठकीत बेडच्या उपलब्धतेबाबत, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत, रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा यासह लसीकरण मोहीम याची माहिती घेतली. बेडची उपलब्धता जरी असली तरी आणखी कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे. येत्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण बहुऊद्देशीय हॉल, वडगाव हवेली ग्रामीण रुग्णालय, उंडाळे ग्रामीण रुग्णालय या 3 ठिकाणी 110 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. जशी गरज पडेल तशी बेड संख्या वाढविले जातील. तालुक्यात लसीकरण सगळीकडे व्यवस्थित होत आहे. लसींचा पुरवठा मर्यादित असल्याने अडचण भासत आहे. परंतु प्रशासनाने दिवसाला 15000 जणांना लस देऊ शकतो अशी यंत्रणा उभारली आहे. पुरेशी लस ज्यावेळी उपलब्ध होईल त्यावेळी लसीकरण मोहीम चांगल्या प्रकारे राबविता येईल. कोरोना परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या