
चांदोली आणि कोयना धरण पाणलोटक्षेत्रात सलग तिसऱया दिवशी अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ सुरूच आहे. मात्र, जिह्यात पावसाने उघडीप दिली. शिराळा तालुक्यातील आरळा-शित्तूर पुलासह कृष्णा आणि वारणा नद्यांवरील 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीची पाणीपातळी आयर्विन पुलानजीक 26 फुटांवर गेली आहे. सध्या पाणीपातळी वाढत असली तरी पुराचा धोका नसल्याची शक्यता पाटबंधारे विभाग व्यक्त करीत आहे.
धरण पाणलोटक्षेत्रात मागील चार दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरूच आहे. मात्र, जिह्यात इतरत्र पावसाचा जोर कमी राहिला. चांदोली धरणक्षेत्रात 24 तासांत 138 मिलिमीटर पाऊस झाला. धरणात 31.05 टीएमसी पाणीसाठा असून, 90 टक्के धरण भरले. धरणातून नऊ हजार 448 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडले.
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सांगली जिह्यातील आरळा-शित्तूर पूल पाण्याखाली गेला. वारणा नदीवरील कोकरूड, चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, दूधगाव, समडोळी, तांदूळवाडी, चावरे, तर कृष्णा नदीवरील नागठाणे, भिलवडी, मौजे डिग्रज, बोरगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.