सामना स्टार…….. मुंबईकर तायक्वांडो क्वीन-संस्कृती वाळुंज

340

 << नवनाथ दांडेकर >>

बालमित्रानो, चिंचपोकळीसारख्या कामगार विभागात राहून संस्कृती संतोष वाळुंज या आपल्या तडफदार भगिनीने तायक्वांडो या ऑलिम्पिक खेळात चमकदार कामगिरी नोंदवत मुंबईकरांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडाशौकिनांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केलीय. तिचे वडील संतोष वाळुंज हे या प्रकारातील 4ऊप् डॅन ब्लॅकबेल्टधारक आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संस्कृतीने शालेय स्तरापासून ते थेट राष्ट्रीय स्तरावर आपल्या अफलातून खेळाचे दर्शन घडवत पदकांची लयलूट केलीय. गेल्या वर्षी भोपाळ (मध्य प्रदेश) येथे पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱया संस्कृतीने यंदाही नवी दिल्लीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करीत आपल्या यशाचा आलेख चढता राखला आहे. याआधी राष्ट्रीय स्पर्धेत तिची पदकांची कमाई होती १ सुवर्णपदक व ३ रौप्यपदके.

दादरच्या व्ही. एन. सुळे विद्यालयात शिकणाऱया संस्कृती वाळुंजने सुमारे ११ वर्षे तायक्वांडो या खेळातील आपली अफलातून चमक दाखवत जिल्हास्तरीय स्पर्धेत ३० पदकांची लयलूट करीत ‘मुंबईकर तायक्वांडो क्वीन’ या तिला क्रीडाशौकिनांनी दिलेला किताब सार्थ ठरवला आहे.

आपल्या वडिलांच्याच एस.डब्ल्यू.एस. तायक्वांडो अकादमीत तायक्वांडोतील अफलातून पदलालित्याचे धडे घेणाऱया संस्कृतीच्या यशात तिच्या आई-वडिलांसह सुळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी वाळके, आणि आता ती शिकत असलेल्या माटुंग्याच्या पोदार महाविद्यालयाच्या प्राचार्या शोभना वसुदेवन, सुपरवायझर लता शेट्टी यांचाही मोठा वाटा आहे. राष्ट्रीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत पाचवेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत संस्कृतीने  ५ पदकांची कमाई केली आहे. अलिबागच्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. संस्कृतीने नवी दिल्लीच्या यंदाच्या राष्ट्रीय शालेय तायक्वांडो स्पर्धेचे तिकीट बुक करीत पुन्हा रौप्यपदकाची कमाई केली आहे. शालेय स्तरावरील उज्ज्वल यशानंतर आता संस्कृतीचे लक्ष्य आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे नाव मोठे करायचे. चिंचपोकळीच्या या हरहुन्नरी महिला तायक्वांडोपटूला आपण भरभरून शुभेच्छा द्यायला हव्यात.

 

देशासाठी आंतरराष्ट्रीय तायक्वांडोपटू घडवायचेत

पोदार महाविद्यालयात ११ वीत शिकणाऱया संस्कृती वाळुंजने आपले बाबा संतोष वाळुंज यांच्याकडून तायक्वांडोचे प्रशिक्षण घेतल्यावर आता ती युवा तायक्वांडोपटूंना प्रशिक्षण देऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय तायक्वांडोत स्वत: देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न संस्कृतीने उराशी बाळगले आहेच. पण ते साकारण्यासाठी झटताना आजीवन युवा तायक्वांडोपटूंना प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडू घडवण्याचे मोठे लक्ष्य संस्कृतीने डोळय़ापुढे ठेवले आहे. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या हिंदुस्थानला एकही ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता तायक्वांडोपटू मिळू नये याचीच खंत संस्कृतीच्या मनाला सलतेय. तिच्या तायक्वांडोपटू घडवण्याच्या उदात्त कार्याला आपण सर्वांनी उत्स्फूर्त दाद द्यायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या