सायबर दुनियेतील वाढती गुंतागुंत

>> ऍड. पवन दुग्गल

जेव्हा जग कोरोनावर विजय प्राप्त करेल, त्यावेळी आपण सायबर यंत्रणेच्या एका नव्या वैश्विक व्यवस्थेला सामोरे जाणार आहोत. यात सरकारे जास्तीत जास्त शक्तिशाली होत जातील आणि सायबर गुन्हे हे रोजचेच रडगाणे बनलेले असेल. सर्वसामान्य माणसाच्या डिजिटल जीवनावर आणि खासगीपणावर जबरदस्त आघात होणार आहे, हे उघड आहे. त्यामुळे या बदलत्या युगासाठी आपण तयार राहायला हवे. सायबर दुनियेत एकमेकांवर अविश्वासाने पाहायला शिकले पाहिजे.

इस्रायलच्या पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून केलेल्या हेरगिरी प्रकरणावरून देशभरात आणि जगभरात खळबळ उडाली आहे. काही निवडक फोन टॅप करण्याचा आरोप करण्यात येत असून, एखाद्या स्पायवेअरच्या माध्यमातून अशी हेरगिरी केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा आरोपांच्या वेळी सामान्यतः सरकारांनाच आरोपीच्या पिंजऱयात उभे केले जाते आणि सरकारकडून आरोपांचा इन्कार केला जातो. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात अशा प्रकरणांमागील सत्य समोर येत नाही, हेच दुर्दैव आहे. शिवाय, हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगभरातील लोकांची स्मरणशक्ती इतकी कमजोर असते की, अशा प्रसंगी दोन-तीन दिवस गदारोळ माजतो आणि नंतर सर्वकाही विसरून प्रत्येकजण आपापली वाटचाल करू लागतो. असे होण्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली धोरण पोकळीची स्थिती. कोणत्याही देशाने अशा प्रकारच्या कृती करू नयेत असे सांगणारा किंवा अशा कृती करणाऱयांना कायद्यासमोर उभे करणारा एकही आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा खुलाशांमधील हवा लगेच निघून जाते.

अशा घटनांमधून एक गोष्ट मात्र सूचित होते ती म्हणजे, जलद इंटरनेटच्या या युगात आपण सुरक्षित आहोत असे कुणीही समजता कामा नये. सध्या ज्या पेगॅसेस सॉफ्टवेअरच्या सहाय्याने हेरगिरी केल्याचा आरोप होत आहे, ते सॉफ्टवेअर केवळ एक मिस कॉल करून एखाद्याच्या मोबाईलमध्ये सोडता येते. हे इतके शक्तिशाली सॉफ्टवेअर आहे, की मिस्ड कॉलला प्रतिसाद दिला नाही तरी ते आपल्या मोबाईलचे नियंत्रण प्राप्त करते आणि मग आपल्या विरोधात जी व्यक्ती या सॉफ्टवेअरचा वापर करीत आहे, त्या व्यक्तीला आपल्या प्रत्येक कृतीची माहिती मिळत राहाते. आपला स्मार्टफोन कधी आपला शत्रू बनतो हे बहुतांश लोकांना समजतच नाही ही मुख्य अडचण आहे. त्यामुळे कुणीही गाफील राहता कामा नये. उलट स्वतःला आणि आपला डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही मूलभूत पावले तातडीने उचलली पाहिजेत. सर्वांत आधी आपण सायबर सुरक्षिततेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि स्वतंत्र जीवनशैलीच्या स्वरूपात त्याचा स्वीकार केला पाहिजे. सायबर सुरक्षितता सरकार देईल, हा विचार चुकीचा आहे. ही केवळ सरकारचीच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत जबाबदारी आहे. आपल्या डिजिटल कृत्यांबाबत जितके सतर्क आणि जागरूक आपण स्वतः राहू तितके आपण अधिक सुरक्षित राहू.

दुसरी गोष्ट अशी की, सावधगिरी आणि सतर्कता हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग बनायला हवेत. आपल्याला इंटरनेट सेवा पुरविणारी कंपनी आपल्या डाटाचे रक्षण करेल, अशी अपेक्षा कदापि ठेवता कामा नये. हे गरजेचे आहे, कारण कोणत्याही लोकप्रिय सोशल मीडिया ऍपचा सर्व्हर हिंदुस्थानात नाही. एवढेच नव्हे तर आपली मोबाईल, कॉम्प्युटर आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे दोन-तीन दिवसांतून तपासून पाहावीत. आपण डाऊनलोड न केलेले एखादे ऍप तर आपल्या मोबाईलमध्ये दिसत नाही ना, याची शहानिशा करावी आणि असे ऍप दिसल्यास ते तत्काळ डिलीट करावे. ज्या ऍपचा वापर करून 15-20 दिवस झाले आहेत, असे ऍपही डिलीट करावे; कारण अशी ऍप्ससुद्धा डाटा चोरतात.

आपण जे काही इंटरनेटवर पाहतो आणि ऐकतो त्यावर झटकन विश्वास ठेवतो. या विश्वासाचे रूपांतर अविश्वासात करण्याची वेळ आता आली आहे. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीच्या सत्यतेविषयी संतुष्ट नसतो तोपर्यंत प्रत्येक माहितीकडे संशयाच्या नजरेने पाहायला हवे. एवढेच नव्हे तर ‘नीड टू नो’ म्हणजेच माहिती करून घेण्याच्या गरजेच्या आधारावरच आपली माहिती शेअर केली पाहिजे. म्हणजेच, आपण ज्यांना ओळखतो त्यांनाच आपण आपली माहिती दिली पाहिजे. तुम्हाला किती मित्र आहेत किंवा तुम्ही कोणत्या वेळी, किती तास काम करता हे जगाला सांगायची अजिबात गरज नसते.

गोपनीयतेचे उल्लंघन करून नुकसान करणे हे सायबर गुन्हेगारांचे उद्दिष्ट असल्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक उपकरण सुरक्षित राखण्यासाठी फायरवॉल आणि अँटी व्हायरसचा वापर जरूर करावा. फायरवॉलचा उद्देश उपकरणाच्या आत सुरक्षिततेची भिंत उभी करणे हा असतो. ही भिंत भेदण्याचा प्रयत्न करणाऱयाला ती थोपवून धरतेच; शिवाय कोणीतरी भिंत भेदण्याचा प्रयत्न करीत असल्याची सूचनाही तत्काळ आपल्याला देते. फोन टॅपिंग प्रकरणांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे सॉफ्टवेअर आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला जातो. फायरवॉल मजबूत असेल तर याची सूचना आपल्याला आधीच मिळू शकते. इंटरनेटवर फायरवॉल निःशुल्क उपलब्ध आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे अँटीव्हायरससुद्धा आपला डाटा सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. तोही इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. परंतु चांगल्या अँटी व्हायरससाठी पैसे खर्च करावे लागतात. मोबाईलमध्ये कमीत कमी ऍप ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण कोणतेही ऍप हेराप्रमाणे काम करू शकते. ज्यांच्या अटी आणि शर्ती आपल्याला माहीत आणि मान्य आहेत, ज्यांची प्रायव्हसी पॉलिसी आणि कंज्युमर रिह्यूसुद्धा आपल्याला पूर्णपणे समजू शकतात, अशीच ऍप डाऊनलोड करावीत.

‘न्यू सायबर वर्ल्ड ऑर्डर पोस्ट कोविड-19’ या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या पुस्तकात प्रस्तुत लेखकाने असे लिहिले आहे की, जेव्हा जग कोरोनावर विजय प्राप्त करेल, त्यावेळी आपण सायबर यंत्रणेच्या एका नव्या वैश्विक व्यवस्थेला सामोरे जाणार आहोत. यात सरकारे जास्तीत जास्त शक्तिशाली होत जातील आणि सायबर गुन्हे हे रोजचेच रडगाणे बनलेले असेल. सर्वसामान्य माणसाच्या डिजिटल जीवनावर आणि खासगीपणावर जबरदस्त प्रहार होणार आहे, हे उघड आहे. त्यामुळे या बदलत्या युगासाठी आपण तयार राहायला हवे. सायबर दुनियेत एकमेकांवर अविश्वासाने पाहायला शिकले पाहिजे.

कोणतेही ऍप आपल्याला जागतिक स्तरावरील सुविधा मोफत देत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या मोबदल्यात हे ऍप आपल्याला त्याचे ‘उत्पादन’ मानते आणि आपल्या डाटाचा वापर स्वतःच्या हितासाठी करते. इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंटसुद्धा स्पायवेअरला बळी पडतात. ही एक प्रकारची धूळ आहे आणि तिचा वापर करून सरकार आणि संस्था आपल्याला लक्ष्य करू शकतातच; शिवाय सायबर गुन्हेगारांच्याही तावडीत आपण सापडू शकतो. यापासून बचावासाठी आपण ‘क्लीन टूल’चा नियमित वापर केला पाहिजे. हिंदुस्थान सध्या एका क्रांतीच्या अवस्थेतून मार्गक्रमण करीत आहे. या क्रांतीला मी ‘द ग्रेट इंडियन व्हॉमेटिंग रिव्होल्यूशन’ म्हणजे ‘हिंदुस्थानची महान उल्टी क्रांती’ असे म्हणेन. आज हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या मंचांवर आपल्याकडील माहिती ‘ओकत’ आहे. याच कारणामुळे आजकाल सायबर विश्वाशी संबंधित गुन्हे वाढले आहेत. वस्तुतः बहुतांश लोकांना समजतच नाही की ‘एचटीटीपीएस’ या अक्षरांनी सुरू होणाऱया वेबसाइटवरूनच आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार केले पाहिजेत. ‘एचटीटीपी’ने सुरू होणाऱया वेबसाइटवरून नव्हे. बनावट वेबसाइटवरून पैशांची देवाणघेवाण करताना आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डसंबंधीची माहिती शेअर केली जाऊ शकते. याच कारणामुळे फोन, कॉम्प्युटर आदी उपकरणांमध्ये महत्त्वाची माहिती सेव्ह करू नये, असा सल्ला दिला जातो.

(लेखक सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील असून इंटरनॅशनल कमिशन ऑन सायबर सिक्युरिटी लॉचे अध्यक्ष आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या