सार्वजनिक जागांवर नमाजसाठी दिलेली परवानगी रद्द, हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे गुरुग्राम प्रशासन झुकले

हरयाणातील गुरुग्राममध्ये सार्वजनिक जागांवर नमाज पढण्याची परवानगी देण्यात आली होती. गुरुग्राममधील 37 जागांवर ही परवानगी देण्यात आली होती, ज्याला हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. या विरोधामुळे 37 पैकी 8 जागांवर नमाज पढण्यासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नमाज पढण्यास विरोध दर्शवला होता. ज्या ठिकाणी नमाज पढला जात होता त्या ठिकाणी निदर्शनं करणाऱ्या 26 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या विरोध प्रदर्शनानंतर जिल्हा प्रशासनाने 8 जागांवर नमाजसाठी दिलेली परवानगी रद्द केली आहे.

2018 साली हिंदू आणि मुस्लिम समुदायातील महत्वाच्या व्यक्तींसोबत बैठक घेऊन नमाजसाठी सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 37 जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. हिंदू संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष महावीर भारद्वाज यांनी नमाज पढण्याची मुभा देण्यात आलेल्या जागांची यादी बोगस असल्याचं म्हटलं आहे. नमाज पढण्यासाठी सार्वजनिक जागा निश्चित करण्यात आल्या नसल्याचं भारद्वाज यांचं म्हणणं आहे. जी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यावर आपल्या संघटनेच्या कोणत्याही नेत्याची सही नसल्याचं भारद्वाज यांनी म्हटलंय. गुरुग्रामचे उपायुक्त यश गर्ग यांनी या प्रकरणी एक समिती नेमली आहे. यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, हिंदू आणि मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी असणार आहेत. ही समिती नमाज पढण्यासाठी कोणती सार्वजनिक ठिकाणे असावीत याची यादी तयार करणार आहे.