स्वच्छंद – ऐटबाज

197

>> विद्या कुलकर्णी

वटवट्या पक्ष्याचे नाव बऱ्याच प्रजातींना एकसारखे असले तरी त्याचे कुटुंब आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असते.

पक्ष्यांची फोटोग्राफी हा माझा छंद होताच, परंतु मागील 4-5 वर्षांत मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खास पक्ष्यांची फोटोग्राफी करू लागले. प्रत्येक पक्ष्यात काही ना काही विविधता, सौंदर्यखुणा असतात. कधी त्यांच्या सुबक आकारात, तर कधी देखण्या नृत्यामध्ये, लयबद्ध मोहक हालचालींमध्ये, भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये ते दिसून येते. पक्ष्यांची बाकदार चोच, लांब शेपटी, लोभस डोळे, आकर्षक रंग असे बरेच काही आपल्याला भुलवून टाकते.

वटवटय़ा पक्ष्यांची शेपटी मला फार मोहक, देखणी वाटली. त्यांची फांदीवर बसण्याची पद्धत खूप ऐटबाज आहे.वटवटया हे पक्षी ‘Cisticolidae’ कुटुंबातले असून कीटकांवर उपजीविका करणारे आहेत. या पक्ष्यांचे वास्तव्य खुल्या गवताळ भागात किंवा खुरटी झाडे असलेल्या भागात आढळते. हे पक्षी स्थानिक असून फक्त हिवाळ्यामध्ये उष्ण भागात स्थलांतर करतात. प्रजनन काळाव्यतिरिक्त हे पक्षी छोटय़ा थव्यामध्ये वावर करतात. या पक्ष्0यांचे पंख लहान असून शेपटी मात्र लांब, निमुळती असते. या पक्ष्यांचा रंग तपकिरी किंवा धूसर असून खालील भाग पांढरा असतो. चोच पातळ असून किंचित वक्र असते. वटवटय़ा पक्ष्यांच्या 22 प्रजाती आहेत.

साधा वटवटया
हे पाकिस्तान आणि हिंदुस्थानपासून दक्षिण चीन आणि दक्षिणपूर्व आशियातील निवासी पक्षी आहेत. पाणथळीच्या, गवताच्या सखल प्रदेशात, खुल्या जंगलात, बागांमध्ये त्यांचा वावर असतो.त्नर व मादी सारखेच दिसतात. हिवाळ्यात मात्र वरील भाग गर्द तपकिरी, खालील भाग जास्त फिकट पिवळसर होतो. शेपटी पण उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लांब होते. घरटे गवतात किंवा खुरटय़ा झाडांमध्ये बांधतात.

राखी वटवटया
राखी वटवटय़ा हे पक्षी हिंदुस्थानी उपखंडातले स्थानिक पक्षी आहेत. हिंदुस्थानात सर्वत्र, नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, पश्चिम म्यानमारमध्ये आढळतात. या पक्ष्यांचा वावर शहरी भागांमध्ये आणि शेतीमध्ये असतो. हे पक्षी आकाराने छोटे असले तरी त्यांच्या रंगांमुळे व सरळ ताठ शेपटीमुळे सहज ओळखू येतात. उत्तरेकडील या पक्ष्यांची पाठ व पार्श्वभाग लालसर तपकिरी असून पंखांचा रंग प्रजनन काळात व इतर वेळी वेगवेगळा असतो. पक्ष्यांची लांबी 13 – 14 सें.मी. असून वजन 6.7 ते 7.5 ग्रॅम्स असते. पंख छोटे व गोलाकार असतात. शेपटी लांब असून तिचा रंग फिकट पिवळ्या रंगांच्या छटांमध्ये असतो. शेपटीची टोके काळ्या रंगाची असून त्यावर ठिपके असतात. शेपटी सरळ, ताठ असून पाय मजबूत असतात. चोच छोटी असून काळ्या रंगाची असते. डोक्याचा मुकुट राखाडी रंगाचा असून खालील भाग लालसर तपकिरी असतो. उडत असताना पंखांचा आवाज एखाद्या विजेच्या ठिणगीप्रमाणे होतो.हे पक्षी वर्षातून दोनदा वसंत ऋतूत व शरद ऋतूत आपल्या अंगावरची पिसे टाकण्याची प्रक्रिया करतात. ते जोडीजोडीने राहतात, परंतु झाडांवर मात्र एकटेच उडय़ा मारताना दिसतात. हे पक्षी झुडुपांच्या टोकावर बसून गाणे म्हणतात. घरटे मोठी पाने एकत्र शिवून बनवलेले असून आतील थर कोळ्यांच्या जाळ्यांनी व केसांनी बनवलेला असतो. घरटय़ाला एका बाजूला प्रवेशासाठी भोक बनवलेले असते. मादी एकावेळी 3 – 5 लंबगोलाकार व चकचकीत अंडी घालते. त्यांचा रंग विटेसारखा किंवा गर्द लालसर तपकिरी असतो. नर व मादी दोघे मिळून अंडी 10 – 12 दिवस उबवतात व पिलांचे संगोपन करतात.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या