आठ कोटींची कमाई करणारी ‘टकर’, जाहिरातीतून कमवते 40 ते 60 हजार डॉलर

सोशल मीडियावर सध्या ‘टकर बडझीन’ नावाच्या श्वानाची चर्चा आहे. ती जगातील सर्वात मोठय़ा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहे. टकर दोन वर्षांची असल्यापासून करोडो रुपये कमावत आहे. तिची वार्षिक कमाई 8 कोटींची आहे.

टकरचे मालक माईक आणि कोर्टनी दोघेही नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या लाडक्या टकरला पूर्णवेळ देतात. ते दोघे टकर आणि तिच्या पिल्लाला म्हणजेच टॉडला पूर्णवेळ सांभाळत असतात. 2018 साली त्यांनी टकरचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले तेव्हा ती फक्त आठ आठवडय़ांची होती. सध्या टकरचे सोशल मीडियावर अडीच कोटी फॉलोवर्स आहेत. टकरची मालकीण कोर्टनी बडझीनने दिलेल्या माहितीनुसार, टकरच्या पेड ऍडसाठी दर तीस मिनिटांना 40 ते 60 हजार डॉलर्स मिळतात. तसेच इन्स्टाग्रामच्या स्टोरीजमधून टकर 20 हजार डॉलर्स कमावते.