उपवास आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन, शारदीय नवरात्र

वैद्य सत्यव्रत नानल

वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होण्याच्या सुमारास येणारा हा नवरात्रीचा काळ. साधारणतः हत्ती/हस्ती नक्षत्र यावेळी सुरू असते. कोजागिरी पौर्णिमेकडे वाटचाल सुरू असते. वातावरणात दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडावा असे दोन्ही जाणवत असते. अशा वेळी माणसाच्या शरीरात पित्ताचा जोर कमालीचा वाढतो आणि पचन शक्ती कमालीची मंदावते. त्यामुळे अम्लपित्त, चक्कर, उलटय़ा, डोकेदुखी असे अनेक त्रास होण्याची शक्यता या काळात असते.

दिवसाचे कडक ऊन आणि रात्रीच्या वाढत्या चंद्राचे शीतल चांदणे यांच्या एकत्रित परिणामाने पावसाने भरलेले तलाव, नद्या यांचे पाणी शुद्ध होऊ लागलेले असते (झालेले नसते) म्हणूनच कोजागिरीनंतर पाणी शुद्ध झालेले समजून वापर वाढवायचा आपल्याकडे निर्देश आहे. त्यामुळे कोजागिरीपर्यंत मांसाहार आणि दुधाचे पदार्थ इत्यादी घेऊ नयेत किंवा कमीत कमी घ्यावेत.

कोजागिरीला मसाले दुधाचा प्रसाद म्हणूनच केला जातो ज्याने कोजागिरीनंतर दुधाचे पदार्थ वगैरे शुद्ध मिळू लागतात असे पारंपरिक प्रथेमध्ये सुचविलेले आहे. शरद ऋतू हा पित्ताचा सर्वात जास्त त्रास देणारा काळ आहे. त्यामुळे पित्ताला सांभाळणारा आहार या काळात घेणे सर्वोत्तम. म्हणजे नेमके काय ते आता आपण पाहू.

– कडू, गोड, तुरट या तीन चवींच्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन या काळात करावे.
– पचायला थंड पदार्थ घ्यावेत.
– पचायला गोड पदार्थ घ्यावेत.

शरद ऋतूमध्ये कोणते पदार्थ चालतात ते आता आपण पाहूया

– देशी गाईच्या दुधापासून बनलेले तूप
– गरम करून थंड झालेले दूध रात्रभर चांदीच्या ग्लासमध्ये ठेवून सकाळी ते दूध प्यावे
– कडू भाज्यांचे प्रकार खावेत.
– दुधी भोपळा याचे हलवा, खीर बनवून घ्यावे.
– गव्हाची खीर, साबुदाणा खीर, शिंगाडा खीर बनवून याच काळात घ्यावी. पोटाला थंडावा आणि शरीराचे सहज पोषणही होत राहते.
– आवळा मुरब्बा, ताजे लोणी, तुळशीच्या बियांची खीर बनवून घ्यावी.
– आवळा/चंदन सरबत घ्यावे. धने जिरे पाणी प्यावे,
– खजूर, काळय़ा मनुका, अंजीर, जर्दाळू आणि पाणी यांचा पातळ कोळ सराबतासारखा बनवून प्यावा.
– मिर्ची, दालचिनी, लवंग, इत्यादी गरम मसाले खाण्यासाठी वापरू नयेत.
– ताजी गोड, तुरट फळे दुपारी खावीत.
– न्याहारीसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी – दुधात बनवलेले पदार्थ, उकडलेले बटाटे, बीट, रताळी, साबुदाणा खीर, तांदळाच्या पिठाचे घावन, न आंबवता केलेल्या पिठाचे मऊ डोसे, इडली आणि ओल्या खोबऱयाची गोड चटणी, मुगाचे लाडू, शिंगाडा पिठाचे लाडू, राजगिरा लाडू घ्यावेत.

मिठाई ः रसमलाई, रसगुल्ला, मलई पेढा, बर्फी, खीर, दुधी हलवा, श्रीखंड, पेठा, कोहोळा खीर किंवा हलवा घ्यावा.

कोशिंबीर/सलाड ः पालक, कोबी, सलाड पाने, डाळिंब, आवळा, कांदा, काकडी, उकडलेले बीट वापरावे. गहू फुलके, ज्वारी, तांदूळ आणि नाचणी यापैकी भाकरी, तांदूळ शिजवून केलेला मऊ भात आहारात ठेवावा. मसालेदार पदार्थ, दही, लोणची, तळलेले पदार्थ, तेल, आंबट पदार्थ, खारवलेले पदार्थ खाऊ नयेत.

पित्ताचे त्रास असणाऱयांनी, मधुमेहींनी, डोकेदुखी असणाऱयांनी कडक उपवास न करता दिवसभर थोडे थोडे खाऊन सौम्य उपवास करावेत. नवरात्री आणि त्यातील उपवास करण्याची पद्धत जरी बऱयापैकी समान असली तरी काही पदार्थ बदलू शकतात. त्यामुळे वरीलपैकी आपल्याला उपवासात जे चालते ते आपण करावे. त्याने उपवास आणि शरद ऋतूचे पथ्य दोन्ही सांभाळले जाईल आणि स्वास्थ्य उत्तम राहील.

[email protected]