खोटय़ा गुह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्या

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने खोटय़ा गुह्यात अडकविण्याची धमकी दिल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यातील माका येथे घडली आहे. याप्रकरणी सोनई पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारंगधर श्रीधर लोंढे (वय 27, रा. लोंढेवस्ती, वाघोली रोड, माका, ता. नेवासा) असे मृताचे नाव आहे. अलका भाऊसाहेब लोंढे, अमोल भाऊसाहेब लोंढे, नीलेश भाऊसाहेब लोंढे (तिघे रा. माका, ता. नेवासा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.

सारंगधर याने लोकांकडून 4 लाख 13 हजार रुपये उसने आणून गावातील वरील आरोपींना दिले होते. या पैशांची मागणी त्याने केली असता, तुझ्यावर छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. त्यामुळे सारंगधर याने शेतातील शेडच्या छताच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी तपास करीत आहेत.