दररोज एकतरी फळ खा..

सकस आणि पौष्टिक आहार गरजेचा आहे. तसेच या आहारात फळांचा समावेश करणंही तितकच गरजेचं आहे. अनेकजण आवडीनं फळं खातात. पण दररोज फळ खाल्ले जातेच असे नाही. .ज्याप्रमाणे आपण दररोजच्या जेवणात भात किंवा पोळी न चुकता खातो तसं आपण दररोज एक तरी फळ खातो का? अनेकांचं उत्तर नाही असं असेल. फळं खाण्याकडे अनेकजण गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र निरोगी राहण्यासाठी आहारामध्ये दररोज एक तरी फळ खाणे फायदेशीर असते. आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारची पोषक तत्व आढळतात. यातील काही पोषक तत्व ही दीर्घकाळ शरीरामध्ये राहतात. तर काही पोषकतत्व पाण्यासोबत शरीराबाहेर टाकली जातात. त्यामुळे या पोषक तत्वांची शरीरात कमतरता निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठीच दररोज फळांचं सेवन करणं गरजेचं आहे.

दररोज एक फळं खाण्याचे फायदे
फायबरची कमतरता भरून निघते-
अनेक फळं ही फायबरचा एक उत्तम स्त्रोत असतात. फळांमधील फायबरमुळे पचन क्रिया जलद होण्यास मदत होते. यामुळे पोटाचं कार्य सुरळीत चालतं. बद्धकोष्ठता तसेच मुळव्याध यांसारख्या समस्या दूर होतात.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर-
वजन कमी कऱण्यासाठी फळांचं सेवन करणं हा एक उत्तम पर्याय आहे. कोणतही फळ खाल्ल्याने त्यातून मिळणाऱ्या फ्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरात चरबी आणि ट्राइग्लिसराइड्स साचत नाही. त्यामुळे वजन वाढत नाही. तसेच कलिंगड, पपई, टरबूज, सफरचंद अशा अनेक फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळत. यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भूक लागत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

त्वचा आणि केस निरोगी होण्यास मदत-
फळांमधील पोषक तत्वांमुळे केस आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. फळांमधील फ्लेवोनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे त्वचेतील कोलेजन बूस्ट होण्यास मदत होते आणि त्वचा स्वच्छ होऊन त्वचेचा पोत सुधारतो. तसचं फ्लेवोनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्समुळे त्वचेसोबतच केसांची चमक वाढते. केस गळती कमी होण्यास मदत होते आणि केस लांब होतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते- फळांमध्ये विटामिन आणि खनिजांसोबतच मोठ्या प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच बॅक्टेरियाचा संसर्ग रोखण्यासाठी फळ फायदेशीर ठरतात. तसचं उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी देखील फळांचं सेवन उपयुक्त ठरतं.

शरीर डिटॉक्स करण्यास मदत– अनेक फळांमध्ये पाण्याच प्रमाण जास्त असतं. तसचं फळांमधील अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. फळांमधील फायबरमुळे पोट साफ होण्यासही मदत होते. फळांमधील मल्टिन्यूट्रियन्ट्स मुळे किडनी, लिवर आणि आतड्यांच्या समस्या दूर होतात.

निरोगी हृदयासाठी फायदेशीर- फळांमधील पोटॅशियम हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी मदत करते तसचं यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून स्ट्रोकचा धोका कमी होतो. फळांमध्ये असलेल्या फॉलेसमुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.
अशा प्रकारे आहारात दररोज किमान एकदा तरी फळं खावं. तसचं प्रत्येत मौसमात त्या मौसमातील फळांचा आहारात समावेश करायला विसरू नका