वीजेचा धक्का लागून दोन जुळ्या भावंडांपैकी एकाचा मृत्यू, एक गंभीर

22

सामना प्रतिनिधी । नागपूर

वीजेच्या उच्चदाब तारेचा शॉक लागून जखमी झालेल्या जुळया भावंडांपैकी एकाचा अखेर मृत्यु झाला आहे. आरमोर्स टाउनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियांश धर या ११ वर्षीय मुलाचा काल शुक्रवारी मध्यरात्री रुग्णालयात मृत्यु झाला. १ जून रोजी घरी क्रिकेट खेळताना झाडावर अडकलेला बॉल काढताना दोन्ही जुळ्या भावंडांना शॉक लागून भाजले होते. ९ दीवार रुग्णालयात मृत्युशी संघर्ष केल्यानंतर प्रियांशचा मृत्यु झाला, तर पीयूष धर ११ वर्ष याची स्थिती अजुनही गंभीर आहे.

बिल्डर आणि महावितरणच्या चुकीमुळे घटना घडल्याचा तेव्हा कुटुंबीयांनी आरोप केला होता. मुळात आरमोर्स टाउनशिप बनली तेव्हाही महावितरणची ही हायटेन्शन लाईन त्या ठिकाणी होती. घराला चिटकून असलेल्या इलेक्ट्रिक वायर संदर्भात नागरिकांनी अनेक वेळेला बिल्डरकडे पाठपुरावा केला. मात्र आजपर्यंत बिल्डरने नेहमीच त्यांची दिशाभूल केली. निराश झालेल्या नागरिकांनी महावितरणकडे अनेक वेळेला तक्रार केली. यात हायटेन्शन लाईन घरांपासून थोड्या अंतरावर नेण्याची किंवा त्याला इन्सुलेशन पाईप मधून नेण्याची विनंती केली. मात्र, महावितरणनंही आजवर यात लक्ष घातलं नाही. अखेर त्याची किंमत दोन चिमुकल्याना मोजावी लागली आहे.

दरम्यान, या टाऊनशिपमध्ये धोकादायक हायटेन्शन इलेक्ट्रीक वायरचा शॉक बसल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. काही महिन्यांपूर्वी तर एका मजुराचा शॉक लागून मृत्यूही झाला होता. मात्र कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. धक्कादायक बाब म्हणजे दोन मुलांचा जीव धोक्यात असताना आजवर बिल्डरने विचारणाही केलेली नाही. तर महावितरण आणि महानगरपालिकेपैकी कोणाचाही अधिकारी धर कुटुंबीयांची साधी भेट घ्यायला ही आलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या