
म्हसवड (ता. माण) येथील राजीव मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेत 1 कोटीचा अपहार केल्याप्रकरणी कुडाळ (ता. जावली) येथील पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
गणेश जगन्नाथ रोकडे (वय 32), धर्मा राऊ गुजर (वय 62), राहुल विठ्ठल बावकर (वय 42), राजेंद्र आनंदा गुजर (वय 59, सर्व रा. कुडाळ, ता. जावली), नाना वामन शिंदे (वय 73, रा. हुमगाव, ता. जावली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
राजीव मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेमार्फत चेअरमन, संचालक व इतरांनी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून औद्योगिक प्रकल्पासाठी 1 कोटी रुपये मंजूर करून घेऊन या रकमेचा अपहार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबाबत 30 मे 2019 रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात पाचजणांविरोधात गुन्हा दाखल आहे. संबंधित आरोपींचा गेल्या तीन वर्षांपासून शोध सुरू होता. 28 नोव्हेंबर 2022 रोजी हे आरोपी कुडाळ व हुमगाव (ता. जावली) येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.
पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे तसेच आर्थिक गुन्हे शाखा यांनी गुह्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलिसांच्या चौकशीत आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कुडाळ व हुमगाव येथे सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांना म्हसवड येथे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली.
सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, प्रमोद नलावडे, प्रशांत नलावडे, संजय मोरे, मनोज जाधव, संतोष राऊत, शफिक शेख, प्रसाद जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.