ट्रॅफिक जाम, फुटलेल्या रस्त्यांनी लालपरीला रोज पाच लाखांचा घाटा

ठाणे परिवहनला 20 दिवसांत एक कोटींचा तोटा; 2 लाख 60 हजार किमी प्रवास रद्द केल्याने फटका

कोरोना आणि कामगारांच्या संपानंतर एसटी महामंडळाचे आर्थिक कंबरडेच मोडले होते. यातून आता कुठे मार्ग निघत असतानाच लालपरीसमोर नवे संकट उभे राहिले आहे. ठाणे शहरासह ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात फुटलेल्या रस्त्यांची व उड्डाणपुलांची कामे सुरू असून ठिकठिकाणी तासन्तास ट्रैफिक जाम होत आहे. यामुळे परिवहन विभागाला दररोज जवळपास 13 हजार किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागत असल्याने पाच लाखांचा घाटा सहन करावा लागत आहे. गेल्या वीस दिवसांत एसटीला एक कोटींचा फटका बसला असल्याची माहिती समोर आली आहे.

एसटीने नवनवीन उपक्रम राबवत, त्यातून मार्ग काढण्याचा कसोटीने प्रयत्न सुरू ठेवला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात मिळालेल्या सवलतीचादेखील फायदा महामंडळाला होत आहे. यामुळे आता कुठे एसटी मार्गावर येत असताना, ऐन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने शहरी भागात उदभवणारी वाहतूककोंडी आणि रस्त्याच्या तसेच पुलांच्या कामांमुळे प्रतिदिनी 5 लाख 10 हजार रुपयांचा नाहक तोटा ठाणे विभागाला सहन करावा लागत आहे. गेल्या 20 दिवसांत एसटीच्या ठाणे विभागाला एक कोटींच्या उत्पन्नावर निव्वळ पाणी सोडावे लागल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

इंधनाच्या नासाडीने नुकसान

पावसाळ्यापूर्वी केली जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे. त्यातच मेट्रो आणि उड्डाणपुलांच्या कामांनी ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, बोरिवली, भाईंदर आदी परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्याचा कळत-नकळत परिणाम एसटी विभागाला बसताना दिसत आहे. या कोंडी आणि रस्त्यांच्या कामांनी एसटीचा दररोज सरासरी 13 हजार किलोमीटरचा प्रवास रद्द होऊ लागला आहे. यामुळे इंधनाचीही नासाडी होऊन नुकसान होत आहे.

14 दिवसांत 8 लाख 81 जणांचा प्रवास

दररोजच्या सरासरीचा विचार केल्यास गेल्या 20 दिवसांत एसटीच्या ठाणे विभागाला अंदाजे 2 लाख 60 हजार किलोमीटर प्रवास रद्द करण्याची वेळ ओढावली असून सुमारे एक कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागत असल्याने प्रशासनाने ही कामे वेळीच मार्गी लावावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, एकीकडे उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाल्यानंतर एसटी विभागाने जादा गाड्यांचे नियोजन सुरू केले होते. 1 ते 14 मे दरम्यान ठाणे जिल्ह्यातून लांब, मध्यम आणि शहरी भागात धावणाऱ्या लालपरीतून 7 लाख 38 हजार 448 महिला तर 1 लाख 43 हजार 32 ज्येष्ठांनी प्रवास केला आहे.