छत्रपतींचा पुतळा उभारणीसाठी १ कोटी रुपये

32

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रशासनाने ४० लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र याविषयी शिवसेनेचे अधिसभा सदस्य डॉ. गोविंद काळे आणि अ‍ॅड. विजय सुबुकडे यांनी जोरदार मागणी केल्यामुळे हा निधी १ कोटी रुपये करण्यात आला. तसेच विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी समितीही स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी अधिसभेची बैठक मंगळवारी (दि.२०) आयोजित केली होती. या बैठकीत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेकडून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविणारे डॉ. गोविंद काळे यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी किती रुपयांची तरतूद केली आहे. याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न चर्चेला आल्यानंतर डॉ. काळे यांनी ४० लाख रुपयांची तरतूद अमान्य करत निधी वाढविण्याची मागणी लावून धरली. यावर राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य तथा अधिसभा सदस्य डॉ. राजेश करपे यांनी हा निधी वाढवून १ कोटी करण्यासाठी आग्रह धरला. याला शिवसेनेच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य अ‍ॅड. विजय सुबुकडे यांनीही आक्रमकपणे निधी वाढविण्याची मागणी केली. या मागणीस सभागृहातील सर्व सदस्यांनी विनाविरोध पाठिंबा दर्शविला. यामुळे पुतळ्याच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांची तरतुद करण्याची घोषणा कुलगुरूंनी केली.

शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी समिती
विद्यापीठात शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी कुलगुरूंनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीमध्ये जालन्याचे भास्कर दानवे, कपील अकात, संभाजीनगरचे प्रा. सुनिल मगरे, डॉ. जितेंद्र देहाडे आणि धाराशिवचे प्रा. संभाजी भोसले यांचा समावेश आहे.

शिंदे यांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव
यावेळी बोलताना डॉ. करपे यांनी छत्रतपी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागणीच्या वेळी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा विनाकारण बळी गेला होता. हा बळी गेल्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. ही बाब गंभीर असल्याचे सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले. यावर सदस्य प्रा. सुनिल मगरे यांनी या प्रकरणात निलंबन केलेले जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव मांडला हा ठरावही बहुमताने मंजूर झाला.

शिवसेनेने घेतले होते लेखी आश्वासन
विद्यापीठात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून वाद सुरु होते. तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली होती. या भेटीत कुलगुरूंकडून अधिकार मंडळे अस्तित्वात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा उभारण्याचे आश्वासन लेखी घेतले होते.

सामाजिक शास्त्रांची पदव्युत्तर सीईटी रद्द
विद्यापीठातर्फे आगामी वर्षांत सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व सीईटी घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र याविषयी प्रा. सुनिल मगरे यांनी ठराव मांडत सामाजीक शास्त्र विषयांमध्ये प्रवेशच होत नाहीत. तर सीईटीला विद्यार्थी कोठे मिळणार? असा सवाल उपस्थित करत सामाजिक शास्त्रातील सीईटी रद्द करण्याची मागणी केली. हा ठरावही बहुमतांने मंजूर करण्यात आला. यामुळे आता केवळ विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमातील प्रदव्युत्तरसाठी सीईटी असणार आहे.

मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचा ठराव
मराठी भाषेचा उगम असलेल्या अंबाजोगाईत मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव डॉ. नरेंद्र काळे यांनी मांडला होता. तसेच यावेळी आद्यकवी मुकूंदराज यांच्या नावाने अंबाजोगाईतील एका महाविद्यालयात अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा ठरावही मंजूर झाला आहे.

विलासराव देशमुख यांच्या नावे अध्यासन
विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी करणारा प्रश्न डॉ. जितेंद्र देहाडे यांनी विचारला होता. यावर झालेल्या चर्चेअंती गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन आणि विकास संस्थेत हे अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठीचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच डॉ. देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली

आपली प्रतिक्रिया द्या