कर्जमुक्तीसाठी विधिमंडळावर धडक, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनात मोर्चा

34

सामना ऑनलाईन, नाशिक

कर्जमुक्ती मिळवून देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मुद्द्यावर येत्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा नेण्यात येईल अशी घोषणा नाशिक येथे येत्या शुक्रवारी होणाऱ्या शेतकरी मेळाव्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. नाशिकच्या गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे शुक्रवार, १९ मे रोजी शिवसेनेचा भव्य शेतकरी मेळावा होत आहे. त्यासंबंधी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा हक्क असून तो मिळवून देण्यासाठी राज्यभर शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’ सुरू आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनावेळी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असे शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

शिवसंपर्क अभियानांतर्गत तालुक्या-तालुक्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दोन-दोन वर्षे मिळत नाहीत, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाही, तूर खरेदीच्या रांगेत उभ्या राहणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचाच नंबर लागतो, असे प्रश्न समोर आले असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या शासनाला मान्य कराव्याच लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी देसाई यांनी शेतकरी मेळाव्याची रूपरेषाही विषद केली.

या पत्रकार परिषदेस नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुहास सामंत, संपर्कप्रमुख बबन थोरात, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, शहरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, भाऊ चौधरी, यतीन वाघ, सत्यभामा गाडेकर, श्यामला दीक्षित, नरेंद्र दराडे, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, चंद्रकांत लवटे, शुभांगी नांदगावकर, भगवान भोगे, राहुल दराडे, माणिक सोनवणे, श्याम साबळे, अल्ताफ खान उपस्थित होते.

संप फोडण्यापेक्षा प्रश्न सोडवा – खासदार संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयात या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, संप फोडण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. राजकारण जरूर करा, पण शेतकऱ्यांच्या व्यथांचे राजकारण करू नका, असा घणाघातही त्यांनी केला.

संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही वर्षांत उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या संपाचा विषय नाशिकमधून पुढे आला असून शेकडो गावांतील शेतकरी संपावर जाणार आहेत. त्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मेळाव्यासाठी नाशिकची निवड केल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा विकासाला विरोध कधीच नसतो, परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन त्यांच्या भविष्याचे थडगे होऊ नये, ही शिवसेनेची भूमिका असून तीव्र विरोध करून भूमी अधिग्रहण कायदा शिवसेनेनेच मोडून काढला, असेही ते म्हणाले.

उद्याच्या शेतकरी मेळाव्याची रूपरेषा
शुक्रवारी सकाळी ९ वाजता नोंदणी. १० वाजता पहिले सत्र सुरू होईल. त्यात नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकरी कृती समितीचे धनंजय जाधव, समृद्धी महामार्गाविरोधात लढा देणारे नानासाहेब पळसकर, अकोला जिल्ह्यातील मेहसान येथील गजेंद्र देशमुख संवाद साधतील. जलयुक्त शिवारच्या वस्तुस्थितीबद्दल योगेश कदम माहिती देतील तसेच ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे आपले विचार मांडतील. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे हेही सहभागी होणार आहेत.

दुसरे सत्र दुपारी २ वाजता सुरू होईल, त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि वनाधिपती विनायकदादा पाटील शेतीप्रश्नांवर मार्गदर्शन करतील. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या मेळाव्याचा समारोप होईल.

आपली प्रतिक्रिया द्या