ताज हॉटेलजवळील इमारतीला आग; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

3

सामना प्रतिनिधी । मुंबई

दक्षिण मुंबईतील ताजमहाल हॉटेलच्या बाजूला असलेल्या चर्चिल चेंबर या पाच मजली इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाला शर्थीच्या प्रयत्नानंतर येथे अडकलेल्या  14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

कुलाबा येथील चर्चिल चेंबर या इमारतीतील तिसर्‍या मजल्यावर दुपारी आग लागल्याने एकच धावपळ उडाली. इमारतीमधील लाकडी सामानामुळे आग अधिकच भडकली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ही आग क्षणात पसरल्याने इमारतीत मोठय़ा प्रमाणात धूर पसरला. 14 जण आतच अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर आत अडकलेल्याना सुखरूप बाहेर काढले. जखमी झालेल्या दोघांना तत्काळ जीटी व बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात श्याम अय्यर (54) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर युसुफ पुनावाला (50) हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिली.