गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची ग्रुप बुकींगला पसंती; 1350 एसटी बस आरक्षित

516

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी येणाऱ्या चाकरमान्याकरीता एसटीने 2200 गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. 29 ऑगस्टपासून एसटीच्या गणपती स्पेशल गाड्यांना सुरुवात होणार आहे. गणपती स्पेशल गाड्यांव्यतिरिक्त ग्रुप बुकींगची व्यवस्था एसटीने सुरु केली असून आतापर्यंत मुंबईहून कोकणात येण्यासाठी 1350 गाड्या आरक्षित झाल्या आहेत. पुढील आठवड्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये  गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवात गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी दरवर्षी एसटी आणि रेल्वे जादा गाड्या सोडते. यंदाही एसटी 2200 जादा गाड्या सोडणार आहे. दि.२९ ऑगस्ट रोजी मुंबईहून 63 जादा गाड्या सुटतील. ३० ऑगस्ट रोजी 374 जादा गाड्या सुटतील. सर्वाधिक जादा गाड्या 31 ऑगस्ट रोजी सुटणार आहेत. यादिवशी 1485 जादा गाड्या सुटतील. 1 सप्टेंबरला 278 जादा गाड्या सुटणार आहेत. यंदा ग्रुप बुकींगची व्यवस्था एसटीने सुरु केली आहे. एखाद्या गावात जाण्यासाठी चाकरमान्यांचा 50 जणांचा समुह एसटीची एक गाडी आरक्षित करू शकतात. एसटीच्या या योजनेला चाकरमान्यांची पसंती मिळाली आहे. आतापर्यंत 1350  गाड्या ग्रुप बुकींग करण्यात आल्या आहेत.

तीन ब्रेक डाऊन कार महामार्गावर तैनात

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने एसटीच्या गाड्या मुंबई-गोवा महामार्गावरुन धावतात. यावेळी अनेक गाड्या रस्त्यावर बंद पडण्याची शक्यता असते. अवेळी चाकरमान्यांना घरी पोहोचण्यास उशीर होऊ नये याकरीता तात्काळ दुरुस्तीसाठी मुंबई – गोवा महामार्गावर एसटीने तीन दुरुस्ती पथकाच्या अत्याधुनिक गाड्या तैनात ठेवल्या आहेत. या गाड्या कशेडी, चिपळूण आणि हातखंबा येथे उभ्या राहणार आहेत. ज्या ठिकाणी गाडी बंद पडल्याची माहिती मिळेल. त्याचक्षणी या गाडीतील तंत्रज्ञ गाडीसह घटनास्थळी पोहोचून गाडी दुरुस्त करणार आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सवात सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांवर उर्वरित महाराष्ट्राचे चालक सेवा बजावत असतात. त्यांना मुंबई-गोवा महामार्गाची माहिती करून देण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी महामार्गावर तैनात राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या