जिल्हा बँकेच्या १० शाखा बंद होणार

29

सामना ऑनलाईन । जळगाव

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिह्यातील दहा शाखा बंद करण्याचा निर्णय आज बँकेच्या संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच पीक विम्यात तफावत असून वेगवेगळा लाभ दिला जात असल्याची तक्रारही बैठकीत करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक अध्यक्षा रोहिणी खेवलकर- खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा बँक सभागृहात झाली. सभेला संचालक गुलाबराव देवकर, रवींद्र पाटील, संजय पवार यांच्यासह संचालक उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या काही शाखा डबघाईस आल्या आहेत, असे बँकेच्या निदर्शनास आलेले आहे. या शाखा बंद कराव्यात किंवा चालू ठेवाव्यात, याबाबत आजच्या संचालकांच्या बैठकीत विचार विनियम झाला. जिह्यातील पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड, अमळनेर तालुक्यातील मांडळ, भडगाव तालुक्यातील कोठली, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा, चोपडा तालुक्यातील बोरगावले, चाळीसगाव तालुक्यातील खरखेड, एंरडोल तालुक्यातील रिंगणगाव, जामनेर तालुक्यातील तळेगाव – हिवरखेडा, पारोळा तालुक्यातील शिरसमणी या शाखा बंद करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

पीक विम्यावरून चर्चा
आजच्या जिल्हा बँकेच्या बैठकीत संचालकांनी पीक विम्यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. जिह्यातील शेतकऱयांना वेगवेगळे लाभ यामुळे मिळत आहेत. या तफावतीची गंभीरपणे दखल घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा बँकतर्फे शासनाकडे तक्रार केली जाईल, असे सभेत अध्यक्षांनी सांगितले. संचालक संजय पवार यांनी चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखान्याची विक्री तर झाली आहे, पण कर्मचाऱयांच्या भविष्य निधीबाबत काय, असा प्रश्न विचारला. साखर कारखान्यातर्फे ११ कोटी रुपये भरण्यात आल्याचे सांगितले. नोटरी करून कारखाना ताब्यात द्यावा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

शेतकऱयांना गायी – म्हशी देणार
जळगाव दूध संघाला नियमित दूधपुरवठा करणाऱया पुरवठादारांना गायी, म्हशी वाटप केल्या जातील, असेही ठरविण्यात आले. दूध सोसायटीतर्फे दूध संघाकडे प्रस्ताव येईल. या प्रस्तावानुसार गायी – म्हशी वाटप करण्यात येणार आहेत.
जिल्हा बँककर्मचाऱयांना दहा लाख रुपये गृहकर्ज देत होती. या कर्जात वाढ करून १५ लाखां पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. तसेच व्याजदर १३ टक्के होता. आता १५ टक्के व्याजाची आकारणी करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. शेतकऱयांना दिल्या जाणाऱया गृहकर्जाचे व्याजदर १३ टक्यावरून ११ टक्के करण्याचे जाहीर करण्यात आले. मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, पणन महासंघातर्फे कापसाला १ हजार रुपये बोनस देण्याच जाहीर करण्यात आले. तसेच सरकारच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे कापूस खरेदी होत नसल्याची ओरड संचालकांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या