कोल्हापूरकरांसाठी शिवसेनेच्या वैद्यकीय पथकाचे रोज दहा तास मॅरेथॉन मेडिकल कॅम्प

657

अवघा कोल्हापूर जिल्हा महापुराने उद्ध्वस्त झाला असतानाच ठाण्यातून दाखल झालेल्या शिवसेनेच्या वैद्यकीय पथकाने कोल्हापूरकरांसाठी अखंड सेवायज्ञ सुरू केला आहे. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजीत दहा तास मॅरेथॉन मेडिकल कॅम्प सुरू झाले आहे. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर डॉक्टरांचे पथक रक्त तपासणीपासून औषधांपर्यंत कोल्हापूरकरांवर अखंड उपचार करत आहे. अवघ्या दोन दिवसांत 15 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी केली असून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत.

महापुरानंतर डेंग्यू, कॉलरा, टायफॉईडचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यासाठी शिवसेना नेते व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसैनिकांसह कोल्हापूरमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट सुरू केले आहे. ठाण्यातील शंभर डॉक्टरांची टीम अद्ययावत साधनांसह कोल्हापूरकरांवर उपचार करण्यासाठी दाखल झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घुनकी, जुने चावरे, शिरोळी (ता. हातकणंगले), वाळीवडे (ता. करवीर), शिरोळ, तानोळी, पट्टणकोडवली, रांगोळी, हुपरी, रेंदाळ, नांदणी (ता. शिरेळे), टेकावडे (ता. शिरोळे), भेंडवडे (ता. हातकणंगले), नांदरे (ता. हातकणंगले), कोची (ता. हातकणंगले), गोविंदराव हायस्कूल (इचलकरंजी), नाटय़गृह (इचलकरंजी), इंडस्ट्रिअल इस्टेट (इचलकरंजी) येथे मॅरेथॉन मेडिकल कॅम्प सुरू झाले आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे अन्य डॉक्टरांसह स्वतः रुग्णांची तपासणी करीत आहेत.

आरोग्यमंत्री आठ दिवस तळ ठोकून
आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवा सेना विस्तारक राहुल लोंढे यांनी मदतकार्यात झोकून दिले आहे. 15 ट्रकमधून पाठवण्यात आलेल्या दहा हजार चादरी, ब्लँकेट, अन्नधान्य, खाद्यतेल, सॅनिटरी नॅपकिन, टॉवेल, अंतर्वस्त्रd, टुथपेस्ट, बिस्कीट आणि खाद्यपदार्थ व औषधांचे वाटप ठिकठिकाणी करण्यात येत आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापुरात बचाव आणि मदतकार्यासाठी तळ ठोकून आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या