दंगलीतील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

543

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या हिंसाचारात जे जखमी झाले आहेत त्यांचा उपचारही मोफत होईल असेही त्यांनी जाहीर केले.  

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. दंगलीत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये जाहीर केले आहेत. तसेच जे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ज्यांची घरे आणि दुकाने जळाली आहेत त्यांना नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे.

इशान्य भागातील दंगलपीडितांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्यन घेतल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले तसेच या दंगलीत सगळ्यांचेच नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

बुधवारपासून हिंसेच्या घटना कमी झाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. या दंगलीत जे कोणी जखमी झाले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येईल. फरिश्ता योजना ही खासगी इस्पितळातही लागू करण्यात आली आहे असेही केजरीवाल यांनी सांगितले.

या दंगलीत आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यावर अंगुलीनिर्देश केला जात आहे. यावर मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की दंगलीचे जे कोणी गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम आदमी पक्षाचा जरी तो व्यक्ती असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, दंगलीचे राजकारण होता कामा नये असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या