पेण येथे १० लाखाचा गुटखा जप्त, २ टेम्पोसह एकास अटक

15
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । पेण

पेण तालुक्यातील वडखळ येथे अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईत बुधवारी सायंकाळी सुमारे १० लाख रुपयांचा गुटखा व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. राज्यात गुटखा बंदी केलेली असताना छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू आहे. पेण तालुक्यातील वडखळ पोलीस स्टेशन हद्दीत अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत गुटख्याची तस्करी करणार्‍या २ गाड्यासह एकाला अटक करण्यात आली आहे. पकडलेल्या गुटख्याची किंमत ९ लाख ४१ हजार ७९६ रुपये आहे. गाड्यांची किम्मत १५ लाख ८५ हजार ५०० रूपये आहे.

पेण, खाटीक आळी येथील गुटख्याचा मुख्य व्यापारी गुड्डू उर्फ शहजाद शेख हा अवैधरित्या गुटखा विक्रीस घेऊन येणार असल्याची खबर अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वडखळ नाक्यावर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांची टीम दबा धरून बसली होती. वडखळ नाक्यावर हे दोन टेम्पो आले असता अन्न व औषध प्रशासनाने अडवले. तपासणी केली असता विमल गुटखाचा अवैध माल विक्रीसाठी नेत असल्याचे समजले. अन्न व औषध प्रशासनाने या कारवाईत शहजाद शेख याला ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या गुटख्याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या