‘गिरीप्रेमी’ सातवे आसमान पे! पुणेकर पोहोचले कांचनजुंगा शिखरावर

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातल्या गिरीप्रेमी या गिर्यारोहण संस्थेच्या 10 शिलेदारांनी आज बुधवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान कांजनजुंगा शिखरावर तिरंगा फडकवला आणि हिंदुस्थानी गिर्यारोहण इतिहासाचा नवा अध्याय लिहिला. नेपाळच्या बॉर्डरवर असलेले हे हिंदुस्थानातील पहिल्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. या शिखराची उंची 8586 मीटर इतकी आहे.

हवामान खराब असतानाही यशस्वी चढाई
मंगळवारी सायंकाळी 5 वाजता सर्व गिर्यारोहकांनी कॅम्प 4 हून शिखर चढाई करण्यास सुरुवात केली. 12 तासांच्या अथक आणि अत्यंत अवघड चढाईनंतर शिखरमाथा गाठला. गिरीप्रेमीच्या 10 गिर्यारोहकांसोबत जगभरातील 20 गिर्यारोहक असे एकूण 30 गिर्यारोहक कांचनजुंगा शिखर चढाईला गेले. त्यातील 21 गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली. हे शिखर चढाईसाठी तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत कठीण आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून येथील हवामानदेखील खराब होते.

  • आजपर्यंत एव्हरेस्टवर सहा हजारांच्या आसपास गिर्यारोहकांनी पाऊल ठेवले आहे तर कांचनजुंगावर केवळ 300 च्या घरात गिर्यारोहक यशस्वी चढाई करू शकले आहेत.

अशी केली चढाई
14 मेच्या सायंकाळी 5 वाजता सर्वांनी कॅम्प 4 सोडले. कॅम्प 4 ते शिखरमाथा ते पुन्हा क्रॅम्प 4 हा बराच मोठा प्रवास आहे. यासाठी तब्बल 24 ते 26 तास लागतात. कांचनजुंगाची अंतिम चढाई ही सर्व गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक होती. यात गिर्यारोहकांचा मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीचा कस लागला. तब्बल 12 ते 13 तासांच्या चढाईनंतर पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान गिरीप्रेमीच्या शिलेदारांनी कांचनजुंगावर तिरंगा फडकावला.