साई भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 10 ठार; मृतांमध्ये सहा अंबरनाथचे

सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 6 जण अंबरनाथ च्या मोरवली गावातील रहिवासी आहेत. याशिवाय या अपघातात सहा महिलांचा समावेश असून दोन पुरुष आणि दोन लहान मुलेही मृत्यूमुखी पडली आहे. शिर्डी महामार्गावर असलेल्या पाथरे शिवारजवळ ही दुर्घटना घडली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदहे सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आणण्यात आले आहेत. या अपघातात 34 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर परिसरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत

  • प्रमिला प्रकाश गोंधळी,वय-45,
  • वैशाली नरेश उबाळे, वय 32
  • श्रावणी सुहास बारस्कर,वय 30
  • श्रध्दा सुहास बारस्कर, वय-4
  • नरेश मनोहर उबाळे,वय-38 (सर्व रा.अंबरनाथ)
  • बालाजी कृष्णा मोहंती, वय-25(ड्रायव्हर)
  • दिक्षा संतोष गोंधळी, वय-18 रा.कल्याण
  • उर्वरित तीन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही

अंबरनाथ, उल्हासनगर परिसरातून काही बसमधून भाविक शिर्डीला निघाले होते. यातील गाईड कंपनीच्या खासगी आराम बस जवळपास 50 प्रवाशांना घेऊन शिर्डीकडे जात होती. शिर्डी महामार्गावर असलेल्या वावी गाव आणि पाथरे शिवार दरम्यान या बसची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर ही बस उलटली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंबरनाथ उल्हानसगर परिसरातून एकूण 15 बस निघाल्या होत्या. अपघातग्रस्त बस ही 5 नंबरची बस होती. चहापाणी झाल्यानंतर भाविकांनी त्यांच्या ग्रुपनुसार बस बदलल्या होत्या. त्यामुळे मृतांची आणि जखमींची नावे समजण्यास विलंब होत आहे. अपघातग्रस्त बस ही ट्रकने दिलेल्या धडकेनंतर एका बाजूने अक्षरश: कापली गेली होती.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले