जम्मू-कश्मीरमध्ये 10 टक्के आरक्षण लागू

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

आर्थिकदृष्टय़ा मागास सवर्णांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये देण्यात येणारे 10 टक्के आरक्षण आता जम्मू-कश्मीरमध्ये लागू करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जम्मू-कश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

सामाजिक न्यायअंतर्गत हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. जम्मूतील नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांना हे आरक्षण लागू होते. मात्र, आता आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांनाही हे आरक्षण लागू होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढणार
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत संसदेत विधेयक मांडले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 31 न्यायाधीश आहेत. त्यात आणखी तीन न्यायाधीश वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 होणार आहे. केंद्र 2009मध्ये सर्वोच्च न्यायालय कायदा, 1956मध्ये सुधारणा केली. त्यावेळी न्यायाधीशांची संख्या 25 वरून 30 करण्यात आली होती. 2016मध्ये एनडीए सरकारने देशातील उच्च न्यायाधीशांची संख्या 906 वरून वाढवून 1079 केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या