‘जय श्रीराम’चा जयघोष न केल्याने 10 वर्षांच्या मुलाला भाजप कार्यकर्त्याची मारहाण

फोटो सौजन्य - TheTelegraph

‘जय श्रीराम’ चा जयघोष करण्यास नकार दिल्याने वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण भाजपच्या कार्यकर्त्याने केल्याचं कळालं आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे. हा मुलगा भाजप कार्यकर्त्याच्या चहाच्या दुकानाबाहेरून जात असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडला. ‘द टेलिग्राफ’ या वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील फुलिया इथे झाल्याचं या वृत्तात म्हटले आहे.

महादेव शर्मा हा चौथीत शिकणारा विद्यार्थी आहे. द टेलिग्राफच्या बातमीत म्हटलंय की भाजप कार्यकर्त्याने केलेल्या मारहाणीत महादेवला बरीच इजा झाली आहे. महादेवला उपचारासाठी रानाघाटच्या उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महादेवला झालेल्या मारहाणीमुळे स्थानिकांमध्ये जबरदस्त संताप असून त्यांनी प्रामाणिकची (भाजप कार्यकर्त्याचे नाव) जबरदस्त धुलाई केली . यानंतर स्थानिकांनी राष्ट्रीय महामार्ग-12 रोखून धरण्याचा प्रयत्न करत प्रामाणिकच्या अटकेची मागणी केली.

महामार्गावर वाहतूककोंडी झाल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि आंदोलकांची समजूत काढली. पोलिसांनी संतप्त स्थानिकांना प्रामाणिकला अटक करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान प्रामाणिक हा फरार झाल्याचे कळाले असून आता त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. प्रामाणिक हा भाजपची स्थानिक नेता मिठू हिचा नवरा असल्याचं कळालं आहे. महादेव शर्माचे वडील हे लाकूडकाम करणारे असून ते तृणमूल काँग्रेसचे समर्थक आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी महादेव हा प्रामाणिकच्या चहाच्या दुकानाबाहेरून जात होता. यावेळी त्याला प्रामाणिकने दुकानात बोलावला आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. महादेवचे वडील हे तृणमूल काँग्रेसचे समर्थक असल्याचे कळाल्याने त्याने ही शिवीगाळ करायला सुरुवात केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 17 एप्रिल रोजी झालेल्या मतदानावेळी महादेवच्या वडिलांनी तृणमूल काँग्रेसला सक्रीय पाठिंबा दर्शवला होता, ही बाब न आवडल्याने प्रामाणिकने महादेवला ही शिवीगाळ केली.

प्रामाणिकने महादेवला ‘जय श्रीराम’चा जयघोष कर असं म्हणत धमकवायला सुरुवात केली. मुलाने त्याला नकार दिल्याने प्रामाणिक संतापला होता. संतापाच्या भरात प्रामाणिकने चौथीत शिकणाऱ्या या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी मध्यस्ती करेपर्यंत प्रामाणिकने महादेवला मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. महादेवला रुग्णालयात नेले असता त्याच्या चेहऱ्याला, डोक्याला आणि पाठीला इजा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. त्याचा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. महादेवची प्रकृती स्थिर असली तर तो झालेल्या प्रकारामुळे प्रचंड घाबरलेला आहे असं डॉक्टरांनी सांगितले आहे.

‘प्रामाणिक मला जय श्रीरामचा जयघोष करण्याची जबरदस्ती करत होता, मी त्याला नकार दिल्याने त्याने मला कानाखाली मारली आणि लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली’ असं महादेवने म्हटलंय. माझ्या सुदैवाने गावकरी तिथे आले आणि त्यांनी माझी सुटका केली असं महादेवने सांगितलं आहे. महादेवला मारहाण झाली असून तो अर्धवट शुद्धीत असल्याची माहिती पीटर मुखर्जी नावाच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देण्यात आली. त्याने तातडीने महादेवला रुग्णालयात दाखल केलं. “भाजप किती क्रूर आहे हे या घटनेवरून पुन्हा दिसून आलं आहे. आईचं छत्र हरपलेल्या मुलालाही त्यांनी सोडलं नाही” असं पीटर मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

प्रामाणिक याची पत्नी ‘मिठू’ हिने मारहाणीचा प्रकार झाल्याचं मान्य केलंय, मात्र तिने आरोप केला आहे की या मारहाणीची सुरुवात मुलाने चिडवल्याने झाली होती. मिठूने म्हटलंय की माझा नवरा या मुलाला चांगला ओळखतो. प्रामाणिकने गंमतीत या मुलाला जय श्रीरामचा जयघोष करायला सांगितलं होतं. यावर दुकानातील काही ग्राहकांनी मुलाला सांगितलं की होतं की तू प्रामाणिकला ‘जय बांग्ला’ असं म्हणायला सांग. यावरून संतापलेल्या महादेवने दगड घेतला आणि चहाच्या दुकानावर भिरकावला असं मिठूचं म्हणणं आहे. या दगडफेकीत दुकानाचं नुकसान झाल्याने माझा नवरा संतापला होता आणि त्याने महादेवला मारहाण केली असं मिठूने सांगितलं आहे. शांतीपूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या