
उदगीर तालुक्यातील वाढवता पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2020साली 176 किलो गांजा बोलेरो जीपमधून घेऊन जात असताना पोलिसांनी तिघांना पकडले होते. या तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे वाढवणा हद्दीत सन 2020 मध्ये गांजाची चोरटी विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने गांजाची वाहतूक करीत असताना तीन आरोपींना 176 किलो गांजा व बोलेरो जीपसह वाढवणा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सापळा लावून पकडले होते. पोलीस ठाणे वाढवणा येथे आरोपी राहुल नीलकंठ पवार, शिरीष रघुनाथ जाधव, सोमनाथ शिवाजी जाधव (सर्व रा. माळेगावतांडा तालुका औराद बर्हाळी, जिल्हा बिदर ( राज्य कर्नाटक)) यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 148/2020 कलम 20(ब) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वाढवणा पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी सदर गुन्ह्याचा प्राथमिक पंचनामा व तपास केला होता तसेच पोलीस निरीक्षक सोंडारे यांनी पुढील तपास करून नमूद गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध भरपूर परिस्थितीजन्य आणि भौतिक पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात मुदतीत दाखल करण्यात आले होते.
सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तपासी अधिकारी, समन्स व वॉरंट बजावणारे पोलीस अंमलदार यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली तसेच गुन्ह्यातील इतर साक्षीदारांची व सदर गुन्ह्याचा पंचनामा करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोषारोपपत्रासोबत दाखल करण्यात आलेली परिस्थितीजन्य व भौतिक पुराव्यावरून न्यायालयाने गुन्ह्यातील नमूद आरोपींना 10 वर्षे करावास व प्रत्येकी 1 लाख रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदरची कामगिरी देवणी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोन्डारे, तत्कालीन वाढवणा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, वाढवणा पोलीस स्टेशनचे सध्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, सहाय्यक सरकारी अभियोक्ता सय्यद, पोलीस अंमलदार साळुंखे, नितीन बेंबडे यांनी परिश्रम घेतले आहेत.