१०० वा चित्रपट!

सचिन खेडेकर… रंगभूमी, नाटक, मालिका, मराठी, हिंदी तसेच तामीळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती सिनेमांतही सहजतेने वावरणारा… सशक्त कलाकार… ‘बापजन्म’ या आपल्या १०० व्या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या संपूर्ण चित्रपट वाटचालीविषयी मनोगत…

सुरुवातीला नाटक नंतर दूरदर्शन मालिकांमध्ये काम करत होतो. मग हळूहळू सिनेमांमध्ये काम करू लागलो. माध्यमं बदलली. कारण त्यावेळी मराठी सिनेमांमध्ये काम नव्हतं म्हणून हिंदी मालिकांमध्ये काम करावं लागलं. मराठी मालिकांमधून मराठी सिनेमांमध्ये जायला हवं, पण त्यावेळेला मराठी सिनेमात विनोदाची लाट होती. त्या लाटेत मला काम नाही मिळालं म्हणून मला हिंदीत काम करावं लागलं. त्यावेळी दूरदर्शन नव्यानेच सुरू झालं होतं. त्यामुळे मालिका, हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा असा प्रवास सुरू झाला. मला शोभेल असं कामच माझ्या वाटय़ाला येतं.  सिनेमांची निवड करणं थोडंसं कठीण होतं. तरीही यावर्षीचे ‘कच्चा लिंबू’, ‘मुरांबा’ हे सिनेमेही उत्तम होते. ‘बापजन्म’मध्ये मी एका वडिलांची व्यक्तिरेखा रंगवली आहे, जे टेसॅव्ही आहेत, आयपॉडवर गाणी लावत धावतात. आपल्याकडे पूर्वीचे जे सिनेमे होते त्यामध्ये आईवडील सोशीक, मुलं स्वार्थी किंवा उलटं असायचं, पण यामध्ये मुलं दूर जातात, मुलं वडिलांना भेटण्यासाठी  विविध युक्त्या योजतात असा प्रवास रंगवण्यात आलाय. तरुण टीमबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे जास्त गंमत आली.

शाम बेनेगलांसारख्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ‘संविधान’साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली. त्यांची कामाची पद्धत अभ्यासू आहे. त्यांच्यामध्ये नटावर होणारे आधीचे संस्कार पुसून नटाला नवीन पद्धतीने घडवण्याची ताकद आहे. अशी कामं त्यांनी माझ्याकडून फार उत्तम करून घेतली.

दिग्दर्शनात अजून मी स्वतःला कधी पाहिलं नाही. दिग्दर्शकाला चारही बाजूला पाहता यायला हवं. नटाला सतत स्वतःवर काम करण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे त्यांना थर्ड पॉइंट ऑफ ह्यू कधी येत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी कधी तसा प्रयत्न केलेला नाही. सिनेमा हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं माध्यम तर रंगभूमी नटाचं माध्यम असून मालिका हे लेखकाचं माध्यम आहे. रंगभूमीविषयी मला अतिशय कौतुक आहे. मी मराठी आणि गुजराती रंगभूमीवर काम केलंय. मला त्याविषयी नितांत आदर आहे. प्रत्येक क्षेत्राची वेगवेगळी बलस्थानं आहेत. प्रत्येकाचे रसिकही वेगळे आहेत. मालिकांतून रोज भेटता येतं. सिनेमांतून थोडं अभावानेही भेटता येतं. त्यापेक्षा जास्त अभावाने प्रेक्षकांना नाटकात भेटता येतं, असं माझं मत आहे.

मराठीत काम करायला आवडतं

माझी मातृभाषा मराठी आहे. मला मराठीत काम करायला जास्त आवडतं. हिंदीमध्ये मी नाइलाजास्तव काम करतो. तेलुगूमध्ये मी तीन सिनेमे केले आहेत. मल्याळम एकच केलाय आणि तामीळमध्ये तीन सिनेमे केले आहेत. दहा-पंधरा वर्षांपूर्वी एक गुजराती सिनेमा केलाय. इतर भाषांमध्ये एक वेगळा अनुभव मिळतो. कारण तामीळ, तेलुगू, मल्याळम अशा भाषांमध्ये सिनेमे हिंदीपेक्षाही जास्त अतिरंजित पद्धतीने दाखवले जातात. आता नवीन गुजराती सिनेमेही चांगले होऊ लागले आहेत. मला उत्तम गुजराती बोलता येतं. त्यामुळे या भाषेत सिनेमा करण्याचा माझा मानस आहे.

 कथाप्रधान सिनेमांचे श्रेय प्रेक्षकांनाही

आज वेगवेगळ्या विषयांवरचे मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत हा कौतुकाचा भाग आहे. याचं श्रेय प्रेक्षक आणि कलाकार दोघांनाही जातं. प्रेक्षकांनी नवीन विषयांवरील चित्रपट बघण्याची तयारी दाखवली म्हणून कलाकारांमध्ये नवीन काहीतरी मांडण्याचा उत्साह वाढला आहे. प्रेक्षक सिनेमाकडे पुन्हा वळत आहेत. आपल्याकडे कथाप्रधान सिनेमे तयार होत आहेत. ‘बापजन्म’नंतर ‘टीसीजीएम’ म्हणजे ‘टेक केअर गुड नाईट’ हा माझा गिरीश जोशी दिग्दर्शित सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.