‘कुरुंदवाड बंद’ ला शंभर टक्के प्रतिसाद

शिरोळ तालुक्याला आलेल्या महापुराने शेती उद्योग यंत्रमाग व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने संपूर्ण शिरोळ तालुका राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावा घर फाळा लाईट बिल, पाणी पट्टी आणि शेतकऱ्यांची कर्जे  माफ करावे व इतर विविध मागण्यासाठी शिरोळ तालुका सर्वपक्षीय पुरग्रस्त कृती समितीच्या वतीने आज पुकारलेल्या तालुक्यातील ‘कुरुंदवाड बंद’ ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

 आज सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय महामोर्चा काढून नगरपरिषद वीज वितरण कंपनी व गाव चावडीवर निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चात शेतकरी शेतमजूर व्यापारी यंत्रमागधारक उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महाप्रलयात महापुराने शिरोळ तालुक्यात शेती व्यापार लघुउद्योग सामान्य नागरीकांची हानी झाली आहे. पूरग्रस्तांना अनुदान मिळावे शेतकऱ्यांची कर्जे व शासकीय कर विज बिल व नगरपरिषदेचे पाणीपट्टी घरफळा एक वर्षासाठी माफ करावा, शेतीचे पंचनामे करून एकरी 60 हजार रुपये मिळावे या मागणीसाठी आज शिरोळ तालुका पूरग्रस्त कृती समितीच्यावतीने कुरुंदवाड शहर बंदची हाक दिली होती. आजचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला. या बंदमध्ये व्यापारी, लघुउद्योग, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, एसटी महामंडळ, शिक्षण संस्था, रिक्षा, यंत्रमाग व्यवसाय सहभागी झाले होते. रिक्षा व एसटी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

आज सकाळी साडेदहा वाजता पूरग्रस्त कृती समितीच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून महामोर्चा काढण्यात आला. प्रारंभी नगरपरिषदेची पाणीपट्टी व घरफळा रद्द करावी या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष जयराम पाटील मुख्याधिकारी निखिल जाधव यांना दिले. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी पाणीपट्टी माफ करण्यात सर्वानुमते निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आज आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चा वीज वितरण कंपनीकडे रवाना झाला. तेथे मोर्चातील माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, राजू आवळे, शरद आलासे यांनी मोर्चाच्या वतीने कार्यकारी अभियंता एस आय मुल्ला यांना निवेदन देऊन शेती व यंत्रमाग घरगुती बिले माफ करावी, कोणाची वीज तोडू नये, अशी मागणी केली. यावेळी मुल्ला यांनी कोणाची वीज तोडणार नाही तसेच वीज बिल माफ करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सलीम दबासे, रमेश तोलदार यांनी पूर्व काळात उत्कृष्ट कामगिरी करून वीजपुरवठा सुरू केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यानंतर मोर्चा  थिएटर चौक, बाजारपेठ, काळाराम मंदिर या मार्गावरून चावडीवर आला. तेथे नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार काटकर यांनी पूरग्रस्तांना दहा दिवसात दहा हजार रुपये अनुदान जमा  करणार असून  पडझडीचे  व्यापारी यंत्रमागधारक यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंडलाधिकारी चंद्रकांत काळगे, तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पाटील, मनोहर कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी मोर्चाच्या वतीने माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, पूरग्रस्त समितीचे निमंत्रक शरद आलासे, शिवसेना शहर प्रमुख राजू आवळे, सिताराम भोसले, डॉ एस के माने, सुनील कुरुंदवाडे, सामाजिक कार्यकर्ता आयुब पट्टेकरी यांनी मनोगत व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या