दीपोत्सवात पुलोत्सव!आजपासून पुलंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू

222

सामना ऑनाईन, मुंबई

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला उद्या 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त पुलं प्रेमींमध्ये उत्साह असून मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘पुलोत्सव’ला गुरुवारी सकाळी पु. ल. अकादमीत शानदार सुरुवात होत आहे. लेखक, अभिनेते, गायक आणि संगीतकार म्हणून पुल यांनी साहित्य- नाटक- चित्रपट आदी क्षेत्रांत केलेल्या मुक्त मुशाफिरीचे दर्शन यानिमित्ताने रसिकांना होणार आहे.

प्रभादेवीतील रवींद्र नाटय़ मंदिरात गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पुलोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर ‘वक्ता दशसहस्रेशु’ हा पुलंच्या दुर्मीळ भाषणांचा दृकश्राव्य कार्यक्रम होईल. पुलंसोबत ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांच्या स्मृतींनाही जन्मोत्सवातून उजाळा देण्यात येईल, 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ‘जुळल्या सगळ्या त्या आठवणी हा सुधीर फडके यांच्या संगीतावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी 7.30 वाजता बाबूजी, गदिमा आणि पुलंवर आधारित संगीत, नृत्य, नाटय़मय आविष्कार सादर होईल. ‘पुलोत्सवा’ची सांगता 18 नोव्हेंबरला पुलंची मुशाफिरी कार्यक्रमाने होईल. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक,  ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर पुलंच्या आठवणी जागवतील. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलांगणात पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनात 12 प्रकाशन संस्था सहभागी होतील. येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता ‘पुलोत्सव’ रंगणार आहे.

लोकमान्य सेवा संघातर्फे दोन दिवस पर्वणी

लोकमान्य सेवा संघातर्फे शनिवारी 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता संस्थेच्या पटांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बहुरूपी ‘पुल’ असा संगीत, नाटय़, साहित्य कार्यक्रम यावेळी होणार असून सौमित्र, सचिन खेडेकर यांचा विशेष सहभाग आहे. सोनाली कर्णिक, अर्चना गोरे, आमोद दातार, नचिकेत देसाई, अनुष्का राजवाडे हे कलाकार सहभागी होतील. रजनी वेलणकर नाटय़ अभिवाचन करणार असून इला भाटे, अनिरुद्ध जोशी, शिल्पा नवलकर, रजनी वेलणकर आणि प्रदीप वेलणकर नाटय़ सादरीकरण करतील. रविवारी 18 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता ‘आठवणी भाईकाकांच्या’ कार्यक्रमात जयंत देशपांडे आणि दीपा देशपांडे पुलंच्या आठवणी सादर करतील. हा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता होईल.

विलेपार्ले येथे चित्रप्रदर्शन

पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या वतीने चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा गुरुवारी, 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगण, लोकमान्य सेवा संघ,  विलेपार्ले पूर्व येथे होई&ल. यावेळी पुलंच्या बहुआयामी प्रतिभेवर आधारित ‘माझे जीवनगाणे’ हा कार्यक्रम सादर होईल.

आपली प्रतिक्रिया द्या