राज्यात लवकरच जलधारा कोसळणार, यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता

>>अमोल कुटे । पुणे

नैऋत्य मान्सून वाऱ्यांवर यंदा एलनिनोचा प्रभाव नसल्याने राज्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०२ टक्के पाऊस कोसळले असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. सध्या वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै मध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता असली तरी ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

यंदा पाऊस-पाणी चांगले राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला होता. मात्र राज्याचा विचार करता यंदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस-पाणी अधिक चांगले असले. विदर्भ, मराठवाड्यात पावसातील खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता आहे. मात्र नाशिक, पुण्यात अंदाजाप्रमाणे चांगला पाऊस झाल्यास जायकवाडी, उजनी धरणांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणीसाठी होईल, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.

शेतीला फायदा:

यंदा पावसाचे प्रमाण चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतीत पिक चांगले उभे राहिल, असे सांगण्यात येत आहे. २ ते ४ जून दरम्यान चांगला पाऊस होणार असून खरीप पेरण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल. पेरण्या लवकर झाल्या तर यंदा खरीप हंगामात चांगले उत्पादन होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘ही’ पिकं येणार मुबलक प्रमाणात:

मूग, मटकी, उडीद अशा कडधान्य पिकांसाठी यंदा आशादायक चित्र आहे. त्यासोबतच सोयाबीन आणि भुईमुगालाही त्याचा फायदा होईल, असा अंदाज डॉ. साबळे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर २०१७ मध्ये सरासरीच्या १०२ टक्के पाऊस

१) पश्चिम विदर्भ विभाग – सरासरी १०० %

२) मध्य विदर्भ विभाग – सरासरी १०२ %

३) पूर्व विदर्भ विभाग – सरासरी १०४ %

४) मराठवाडा विभाग – सरासरी १०० %

५) कोकण विभाग – सरासरी १०२ %

६) उत्तर महाराष्ट्र – सरासरी १०३ %

७) पश्चिम महाराष्ट्र – सरासरी १०२ %

आपली प्रतिक्रिया द्या