नवरदेवाचे वय 103 वर्षे, नववधूचे वय 37 वर्षे…वाचा सविस्तर…

विवाहाबाबतच्या विविध विचित्र गोष्टी ऐकण्यात येतात. तसेच नवरदेव आणि नववधूचे वयही लग्न करताना विचारात घेतले जाते. मात्र, इंडोनेशियामध्ये एका व्यक्तीने त्याच्यापेक्षा तब्बल 66 वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी विवाह केल्याने या विवाहाबाबतच्या चर्चा सुरू आहेत. सोशल मिडीयावर या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या विवाहाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. तर अनेकांनी यावर टीका केली आहे. विशेष म्हणजे नवरदेवाचे वय 103 वर्षे आहे, तर नववधूचे वय 37 वर्षे आहे.

इंडोनेशियामध्ये झालेला हा विवाह सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे. 103 वर्षांच्या पुआंग कट्टे या माणसाने त्याच्यापेक्षा 66 वर्षांनी लहान असलेल्या 37 वर्षांच्या इंडो अलंग या महिलेशी विवाह केला आहे. फेसबुकसह इतर सोशल मिडीयावर याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांमधील वयाचा मुद्दा मांडत नेटकऱ्यांनी याविरोधात आवाज उठवला आहे. पुआंग कट्टे हे एक डच कर्नल आहेत. 1945-1949 या काळातील दुसऱ्या महायुद्धात ते सहभागी झाले होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. विवाह करणाऱ्या महिलेला पुआंग यांच्या वयाबाबत माहिती नव्हती. मात्र, त्यांचे वय 100 वर्षांच्या पुढे असल्याचे महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले. पुआंग आणि इंडो लग्नानंतर दक्षिण सुलावेसी येथील पुआंग यांच्या निवासस्थानी राहत आहेत.

हा विवाह हुंडा देत जबरदस्तीने करण्यात आल्याचा आरोप अनेक सामाजिक संघटनांनी केला आहे. पुआंग यांनी महिलेच्या कुटुंबियांना 25 हजार रुपये आणि सोन्याची अंगठी देऊन हा विवाह केल्याची माहिती मिळाली आहे. खूपच तुटपुंजी रक्कम देत हा विवाह करण्यात आल्याने यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हे हुंडाबळीचे प्रकरण असून यावर योग्यवेळी कारवाई केली नाही तर अशा घटना वाढण्याची भीती सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे. समाजात जनजागृती करून अशा अनिष्ट प्रथेविरोधात मोहिम उघडण्याची गरज व्यक्त होत आहे. याआधीही वयात तफावत असूनही लग्न झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 2017 मध्ये 76 वर्षांच्या एका महिलेने 16 वर्षांच्या तरुणाशी लग्न केले होते. तर 2016 मध्ये जिम्बाब्वेमधील 70 वर्षांचे मंत्री केन मथेमा यांनी 23 वर्षांच्या बथाबेत्सो नारे या महिलेशी विवाह केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या