इनोव्हातून गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

परराज्यातून शहरात विक्रीसाठी आणलेला 106 किलो गांजा संभाजीनगरात पकडण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून हा गांजा जप्त करण्यातच आला आहे. गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

हैदराबाद येथून शहरात विक्रीसाठी 106 किलो गांजा येत असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेला मिळाली होती. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पोलीस पथकाने मयूर पार्क हर्सुलकडे जाणाऱ्या MH 03 BC 2713 ही नंबर प्लेट असलेल्या इनोव्हाला अडवले. यावेळी चालकाने गाडी थांबवली खरी मात्र पोलिसांना पाहून तो आणि त्याचा साथीदार पळून गेले. पोलिसांनी या दोघांचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. विशाल छगन तामचीकर (47 वर्षे) आणि शेरसिंग अमू इंदरेकर (वय- 36 वर्षे, रा . बलूची गल्ली नारेगाव) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी पकडलेल्या गांजाची किंमत 5 लाख 31 हजार 500 रूपये इतकी आहे. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

28 सप्टेंबरला स्कॉर्पिओतून ड्रग तस्करी करणाऱ्यांना अटक
संभाजीनगर शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने तीन दिवसांपूर्वी पकडलेहोते. पंचवटी चौकात सापळा रचून आरोपींना अटक केली. हे आरोपी ज्या वाहनातून तस्करी करत होते त्या वाहनावर एका नगरसेविकेचा लोगो असल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी स्कार्पिओ वाहनासह आरोपींच्या ताब्यातून 13 ग्रॅम ड्रग्ज आणि 28 ग्रॅम चरस जप्त केले होते. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहरात ड्रग्ज आणि चरस विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे 28 सप्टेंबरच्या कारवाईनंतर उघडकीस आले होते. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या दालनातील सहायक निरीक्षक राहुल रोडे, वेदांतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, सिटी चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सय्यद मोहसिन, उपनिरीक्षक राहुल भदरगे तसेच फॉरेन्सिक विभाग, अन्न व औषधी नियंत्रण विभागाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पथकासह सापळा रचून सकाळी सोमवारी अकराच्या सुमारास पंचवटी चौकात भरधाव वेगाने कन्नडच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओला (Mh 20, AR 0002) अडवले होते. या वाहनावर मनपा नगरसेविकेचा लोगो आहे. या नगरसेविकेचा पती कोण याची चर्चा आयुक्तालयात सुरू होती.

ड्रग्जचे राजकीय कनेक्शन उघड झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वाहनातील कुर्ला येथील आशिक अली मुसा कुरैशी (41) आणि बांद्रा भारतनगरातील नुरोद्दीन बद्रोद्दीन सय्यद (40) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात 28 ग्रॅम चरस आणि दहा मेफ्रोड्रेन 13 ग्रॅम ड्रग्ज असे अमली पदार्थ सापडले. दोघांची चौकशी केली असता त्यांनी अमली पदार्थ हे मुंबई येथून खरेदी केल्यावर त्याची कन्नड येथे विक्री करण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पकडलेल्या या अमली पदार्थांमध्ये मेफ्रोड्रेन एम डी ड्रग्जची किंमत मुंबईत चार हजार रुपये प्रतिग्रॅम, तर संभाजीनगरात त्याची दुप्पट भावाने विक्री होते.

पॉलिटिकल कनेक्शन शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
शहरात नशेच्या गोळ्या विक्रीची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. शहरात ड्रग्ज आणि चरसचाही गोरखधंदा जोमाने सुरू आहे. ड्रग्जचे राजकीय कनेक्शन समोर आल्याने ते उघड करण्यासाठी पोलिसांसमोर नवे आव्हान आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाल्यास मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

महाविद्यालय आणि मोठ्या हॉटेल परिसरात अड्डे…
शहरात नशेडींचे प्रमाण वाढत असून, त्यातून अनेक वेळा गँगवार उफाळून आलेले आहे. ड्रग्ज आणि चरसची देखील शहरात मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मोठमोठे हॉटेल आणि महाविद्यालयाच्या पार्किंगच्या आवारात ही मंडळी सर्रास अमली पदार्थ विक्री करतात. कोड वापरून ठराविक ग्राहकांनाच ड्रग्ज विक्री होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या अड्ड्यांकडे पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या