हस्तांदोलन करून त्याने ११ विद्यार्थ्यांना केले जखमी

52
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । हरियाणा

एका दहावीच्या विद्यार्थ्याने ११ विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे. हरियाणातील बल्लभगढ इथल्या अग्रवाल पब्लिक स्कूल शाळेत ही घटना घडली. या विद्यार्थ्याने त्याच्या हाताच्या एका बोटाला दाढी करण्याचे ब्लेड हाताला चिकटवले होते. हाताला ब्लेड लावून तो शाळेतील इतर विद्यार्थ्यांशी हात मिळवत त्यांना जखमी करत होता. त्या विद्यार्थ्याचे नाव अद्याप कळलेले नसून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधल्या सुट्टीत १० वीचा एक विद्यार्थी त्याच्या हाताच्या बोटाला दाढी करण्याचे ब्लेड सेलोटेपने चिकटवून शाळेच्या जिन्यावर बसला होता. त्यावेळी त्याने तिथे असलेल्या मुलांना हात मिळवायला बोलावले. त्याने बोलवल्यावर एक विद्यार्थी त्याला हात मिळवायला गेला आणि त्याच्या हाताला ब्लेड लागलं. अशा प्रकारे त्याने एकूण ११ जणांना जखमी केले.

या ११ जणांच्या हातातून आलेले रक्त पाहून संपूर्ण शाळेत विद्यार्थ्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरडाओरडमुळे ही घटना शाळेचे मुख्याध्यापक प्रविण कपूर यांना कळली. त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी त्या विद्यार्थ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. या कृत्यामुळे सदर विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या