चार वर्षांतला दहावीच्या निकालाचा नीचांक; शिक्षण मंडळाने सांगितली कारणे

राज्याच्या दहावीच्या निकालात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 3.11 टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा निकाल 93.83 टक्के एवढा आहे. चार वर्षांतील निकालाचा हा नीचांक आहे. बारावीच्या निकालापाठोपाठ दहावीच्या निकालातही घट झाली आहे.

राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी, बारावीचा निकाल कमी लागल्याची कारणे स्पष्ट केली. यंदाच्या दोन्ही निकालांवर कोरोनाचे सावट असल्याचे ते म्हणाले. 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी बहुतेक विषयांच्या परीक्षा झाल्या होत्या, तर 2021 मध्ये परीक्षाच घेण्यात आली नाही. विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षांवरूनच गुण देण्यात आले, तर 2022 मध्ये सुरळीतपणे परीक्षा पार पडली. मात्र अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता. शिवाय परीक्षेसाठी वाढीव वेळेची सवलतही दिली होती.

कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचबरोबर लेखन क्षमतेवर परिणाम झाला. यंदाच्या परीक्षेसाठी 100 टक्के अभ्यासक्रम होता. सलग तीन वर्षे कोरोनाचा परिणाम जाणवला. याचा एकत्रित परिणाम निकालावर झाल्याचे गोसावी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मंडळाकडून यंदा राज्यभर गैरमार्गाशी लढा ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याचेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

निकाल घसरण्याची कारणे

  • कोरोना काळात दोन वर्षे अभ्यासात खंड
  • अध्ययन क्षमता, लेखन क्षमता कमी
  • दोन वर्षे अभ्यासक्रम कमी
  • यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा
  • परीक्षेसाठी वाढीव वेळेची सवलत बंद
  • गैरमार्गाशी लढा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी

चार वर्षांचा दहावीचा निकाल (टक्केवारी)

  • 2020    –      95.30
  • 2021    –      99.95
  • 2022    –      96.94
  • 2023    –      93.83