दहावीतील विद्यार्थ्याची टोळक्याकडून निर्घृण हत्या

24

सामना ऑनलाईन । पिंपरी

पिंपरी येथील पूर्णानगर परिसरात एका १६ वर्षीय विद्यार्थ्याची एका टोळक्याकडून निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर येत आहे. वेदांत भोसले असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

वेदांत हा निगडी येथील माता अमृता शाळेत दहावीत शिकत होता. दहावीची परीक्षा सुरू असल्यामुळे तो त्याच्या मैत्रिणीसोबत घरी अभ्यास करत होता. अभ्यास केल्यानंतर रात्री तो तिला सोडण्यासाठी गेला होता. तिला घरी सोडून परतत असताना वाटेत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने गळा, मान आणि डोक्यावर सपासप वार केल्यामुळे वेदांत गंभीर जखमी झाला. घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी वेदांतला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे घाबरून हल्लेखोर पसार झाले.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर वेदांतच्या मित्रांनी खासगी वाहनातून त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. वेदांतची हत्या का झाली यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असून प्रेमप्रकरणावरून त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या