११ लाख घेऊन दिली नोकरीची बनावट ऑर्डर; दोघांविरोधात गुन्हा दाखल

29

सामना प्रतिनिधी । अमरावती

अमरावती शहरातील आदर्श नेहरुनगरमध्ये राहणाऱ्या युवकाला शासकीय नोकरी अमिष दाखवत दोघांनी ११ लाख रुपयांना गंडा घातला. युवकाला सरकारी नोकरीची ऑर्डरही दिली. मात्र नोकरीची ऑर्डर बनावट असल्याचं समजल्यानंतर युवकाच्या वडिलांना पोलीस स्टेशन गाठलं. याप्रकरणी युवकाच्या वडिलांनी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी मंगेश वानखडे आणि आशिष जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मंगेश वानखडे हा गणेश बैलमारे यांच्या मोठ्या मुलाचा मित्र आहे. त्या दोघांची मार्केटिंगच्या व्यवसायातून ओळख झाली आहे. दरम्यान बैलमारे यांच्या मोठ्या मुलाने मंगेशला सांगितले की, माझा लहान भाऊ आशिष हा पदवीधर असून तो नोकरीच्या शोधात आहे. त्यावेळी मंगेशने त्यांना सांगितले की, फुड कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी अकरा लाख रुपये द्यावे लागतील. ही रक्कम देण्यासाठी बैलमारे यांनी होकार दर्शवला. त्यानंतर आधी ३ लाख रुपये द्या, ऑर्डर मिळाल्यानंतर उर्वरीत रक्कम द्यावी लागेल. त्यानुसार बैलमारे यांनी ३ लाख रुपये दिले. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०१५ला अविनाश जाधव नामक व्यक्तीच्या खात्यावर २ लाख रुपये ट्रान्सफर केले. ही रक्कम देताच १५ ऑक्टोबरला मंगेशने आशिष बैलमारे यांच्या नावाची नोकरीची ऑर्डर दिली. त्यानंतर ३१ ऑक्टोंबर २०१५ ला पुन्हा बैलमारे यांना सहा लाख रुपये अविनाश जाधवच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. बैलमारे यांनी ते जमा केले.

अकरा लाख रुपये दिल्याचा आरोप बैलमारे यांनी तक्रारीत केला आहे मात्र अजूनही नोकरीची ऑर्डर आली नाही किंवा त्यांना रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे बैलमारे यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक, बनावट दस्ताऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या