देशातील कोरोनाची 11 टक्के प्रकरणे 20 वर्षांखालील व्यक्तींमध्ये, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती

कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या लसीची लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संकटात देशात 11 टक्के प्रकरणे ही 20 वर्षांखालील व्यक्तींमध्ये नोंदविली गेली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.

राष्ट्रीय नियामक-सीडीएससीओने भारत बायोटेकला 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोरोना लसींची क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. डीएनए-आधारित लसीच्या चाचणीसाठी, सार्स-कोव्ही -2 आणि क@डिला हेल्थकेअर लिमिटेड, अहमदाबाद यांना 12 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटाच्या व्यक्तींवर चाचणीस परवानगी देण्यात आली आहे. या चाचण्यांच्या निष्कर्ष आणि लसींच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना संसर्गामुळे थेट फुप्फुसातील तंतुमय रोग आणि थ्रोम्बोटिक घटनांमध्ये वाढ होण्यासारख्या गुंतागुंत वाढत आहेत असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान मोठय़ा प्रमाणात बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोविडनंतरच्या गुंतागुंतीचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र संशोधन कक्ष स्थापन करण्याची सूचना केली आहे. यासंदर्भात आरोग्य सेवा महासंचालकांच्या अधीन असलेल्या तज्ञांच्या गटाने सल्लामसलत केली असल्याचे राज्यमंत्री पवार यांनी सांगितले.

उपचारांचा आणि परिणामाच्या अभ्यासासाठी क्लिनिकल रजिस्ट्री

देशातील रुग्णालयांत दाखल असलेल्या कोविड रुग्णांच्या क्लिनिकल आणि प्रयोगशाळेची वैशिष्टय़े, उपचार आणि परिणामांची माहिती एकत्रित करणे. तसेच कोरोना रुग्णांवरील उपचारांचा आणि परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आयसीएमआरने एक राष्ट्रीय क्लिनिकल रजिस्ट्री स्थापन केली आहे. याद्वारे कोविडशी संबंधित मल्टीसिस्टम प्रक्षोभक डिसऑर्डर मुले आणि किशोरवयीन मुलांचे विश्लेषण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या