धक्कादायक…. क्वॉरंटाईन असूनही 11 जणांचा टेम्पोतून प्रवास; गुन्हा दाखल

926

लॉकडाउनमुळे पुणे शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. संचेती चौकात तपासणीत एका टेम्पोतून प्रवास करणाऱ्या 11 जणांच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का पाहून पोलिसही चक्रावले होते. संबंधितांची चौकशी केली असता कामानिमित्त परराज्यातून आलेल्या कामागारांना ठेकेदार टेम्पोतून नेत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, क्वॉरंटाईन असतानाही प्रवास केल्यामुळे 11 जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 10 दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या मोठ्या चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संचेती चौकात शिवाजीनगर पोलीस वाहनचालकांची तपासणी करीत होते. त्यावेळी एका टेम्पोतून 11 जण प्रवास करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्यांना टेम्पोतून खाली उतरवून चौकशी केली असता, त्यांच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, परराज्यातून प्रवास केल्यानंतर ठेकेदार त्यांना घेऊन कामावर निघाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर पोलीस संचेती चौकात नाकाबंदी करीत होते. त्यावेळी एका टेम्पोतून 11 क्वारंटाईन प्रवासी आढळून आले. त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय संबंधित ठेकेदाराला कामगारांना क्वॉरंटाईन करण्याचे सांगण्यात आले आहे.
– बाळासोहब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर

आपली प्रतिक्रिया द्या