आजोबांनी बलात्कार केल्याने 11 वर्षांची मुलगी गर्भवती झाली, पंथाच्या भयाने कुटुंबाने केला होता गर्भपाताला विरोध

सावत्र आजोबाने बलात्कार केल्याने अवघ्या 11 वर्षांची मुलगी गर्भवती झाली आहे. आपल्यावर आजोबाने वारंवार बलात्कार केल्याचं या मुलीने सांगितलं आहे. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आजोबाचं वय हे 61 वर्ष असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या मुलीच्या गर्भात 21 आठवड्यांचे भ्रूण होते जे पाडण्याचा तिने निर्णय घेतला होता. सुरुवातीला तिच्या घरच्यांनी गर्भपाताला कडाडून विरोध केला होता असं बोलिव्हीयातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

बोलिव्हीयातील यापाकानी शहरात ही हादरवणारी घटना घडली आहे. मुलीचं कुटुंब हे कॅथलिक असून, पंथाच्या दबावापोटी या मुलीच्या आईने सुरुवातीला मुलीची प्रसुती होऊ द्या अशी भूमिका घेतली होती. मुलगी गर्भवती असल्याचं कळाल्यानंतर तिच्या पोटातील गर्भ पाडण्यासाठी आधी तिची आई तयार झाली होती, मात्र कॅथलिक संस्थांनी तिला फोन करून गर्भपात करू नकोस असं म्हणत तिच्यावर दबाव आणला होता. या दबावामुळे घाबरलेल्या आईने गर्भपाताला विरोध करायला सुरुवात केली.

मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि न्यायप्रणालीतील अधिकाऱ्यांनी या मुलीच्या आईला समजावण्याचा बराच प्रयत्न केला. गर्भपात केला नाही तर प्रसुत मुलीच्या जीवावर बेतू शकते असं तिच्या आईला वारंवार समजावून पाहिलं, मात्र मुलीची आई ऐकायला तयार नव्हती. अखेर बरंच समजावल्यानंतर तिची आई गर्भपातासाठी तयार झाली, ज्यानंतर मुलीचा गर्भपात करण्यात आला. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पीडित मुलगी आणि तिची 15 वर्षांची बहीण हे तिच्या सावत्र आजोबाकडे राहात होते. मुलीचे आईवडील दोघेही मजूर असल्याने त्यांना मुलींची नीट देखभाल करता येत नव्हती. ज्यामुळे त्यांनी मुलींना आजोबाकडे सोडलं होतं. मुलींची असहाय्यता पाहून आजोबाने लहान बहिणीवर बलात्कार केला. पोलिसांनी या नराधम आजोबाला अटक केली आहे.