मुंबई लॉटरीसाठी 10 मिनिटांत 115 अर्ज, घराच्या किमती वाढल्या तरी म्हाडासाठी मुंबईकरांची झुंबड

गेल्या चार वर्षांपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांसाठी सोमवारचा दिवस चांगलाच सुखद ठरला. म्हाडाच्या 4 हजार 83 घरांसाठी आजपासून अर्ज नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून 10 मिनिटांत 115 अर्ज दाखल झाले तर 6 जणांनी पैसे भरले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 660 अर्ज दाखल झाले तर 208 अर्जदारांनी पैसे भरले. मुंबईत खासगी विकासकांच्या घरांची किंमत कोटय़वधीच्या घरात पोहोचलेली असताना त्या तुलनेत अगदी स्वस्तात उपलब्ध होणाऱया घरांसाठी मुंबईकरांची झुंबड उडाली. दरम्यान, मुंबई मंडळाच्या घरांसाठी अंदाजे दीड लाखांहून जास्त अर्ज दाखल होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत सर्वसामान्यांसमोर घर अगदी स्वस्तात घेण्याचा एकमेव पर्याय म्हणजे म्हाडाची घरे आहेत. मुंबई मंडळाच्या आजच्या जाहिरातीत मुंबई उपनगरातील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायनसह मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादरमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घरांच्या अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आला. या वेळी मंडळाच्या सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे, उपमुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड, मुख्य लेखा अधिकारी एम. रोड्रिगस, म्हाडाचे मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी बोधिले,  प्रोबीटी संस्थेचे संचालक जितेंद्र जोशी, प्राधिकरणाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले उपस्थित होते.

एकच अर्ज कायम राहणार

म्हाडाने राज्यातील सर्व मंडळांसाठी तयार केलेल्या नवीन ऑनलाईन सिस्टीमने ग्राहकाला राज्यातील कोणत्याही मंडळातील घरासाठी अर्ज करता येणार आहे. जोपर्यंत घर लागत नाही तोपर्यंत त्यात बदल करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रत्येक लॉटरीसाठी नव्याने अर्ज भरण्याची कटकट संपणार आहे. मात्र काही वेळा कालावधीनुसार काही अपडेट करावे लागण्याची शक्यता आहे.

मुख्य जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध

म्हाडाने नव्याने सुरू केलेल्या सिस्टीमप्रमाणे ऑनलाईन कारभारावरच भर दिला. मुंबईकरांनी आज म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात वर्तमानपत्रात शोधण्याचा आटापिटा केला. मात्र ती सापडत नव्हती. पुनःपुन्हा पेपर चाळल्यावर रंगीत पानावर म्हाडाच्या मूळ जाहिरातीचा मोजका मजकूर असलेली त्रोकट जाहिरात दिसली. पण मुख्य तीन ते साडेतीन पानांची जाहिरात म्हाडाने संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपवर अपलोड केली होती. त्यामुळे म्हाडाची बातमी आली, पण जाहिरात प्रसिद्ध करायला विसरले की काय, असे काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

गोरेगावमध्ये तीस लाखांत तर ताडदेवमध्ये साडेसात कोटींत घर

म्हाडाने गोरेगावमधील पहाडी गोरेगाव या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतील सर्वात स्वस्त आणि सर्वाधिक घरे उपलब्ध करून दिली आहेत. गोरेगावमध्ये 2 हजारांपैकी 1 हजार 947 घरे वार्षिक उत्पन्न तीन लाख असलेल्यांसाठी 30 लाखांत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महागडी घरे वर्सोवा, जुहूमध्ये असून सर्वाधिक किंमत असलेले साडेसात कोटींचे घर ताडदेवमध्ये आहे.

95 टक्के इमारतींना ओसी

मुंबईतील सर्व इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. काही इमारती या कोरोना काळात क्वॉरेंटाईन सेंटर म्हणून दिल्या गेल्या होत्या. मात्र आता या सर्व इमारती म्हाडा परत मिळालेल्या आहेत. जाहिरातील 95 टक्के इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेली आहे. त्यामुळे घर लागल्यानंतर दोन-तीन दिवसांतच लाभार्थ्याला पैसे भरण्यासाठी पत्र पाठवले जाणार असून त्यांना अगदी कमी कालावधीत घराचा ताबा मिळणार आहे.

सिस्टीममध्ये लाभार्थ्यांची घुसखोरी रोखणार

सदनिका विक्रीकरिता म्हाडाने तयार केलेली नवीन संगणकीय प्रणाली सुसज्ज असून त्यामुळे फसवणुकीला आळा बसणार आहे. नुकत्याच निघालेल्या कोकण मंडळातील लाभार्थी असो की त्याआधी निघालेल्या म्हाडा किंवा इतर सरकारी योजनांतील लाभार्थ्यांनी सिस्टीममध्ये जाऊन घर स्वीकारल्याची नोंद केली असल्यास अशा लाभार्थ्याला मुंबई मंडळासाठी अर्ज करता येणार नाही. सिस्टीममधून त्या लाभार्थ्यांची लगेच ओळख पटवून त्याला तसा मेसेज पाठवला जाणार आहे. त्या लाभार्थ्याच्या नावाला सिस्टीम स्वीकारणार नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना पुन्हा घुसखोरी करण्यापासून 100 टक्के रोखता येणार आहे. त्यामुळे गरजू व्यक्तीलाच घर मिळण्यास मदत होणार आहे.