पुणे शहर पोलीस दलात कोरोनाचा प्रकोप; तब्बल 1 हजार 150 जण बाधित, 6 जणांचा मृत्यू

पुणे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या पोलिसांना कोरोनाने ग्रासले आहे. आतापर्यंत शहर पोलीस दलातील तब्बल 1 हजार 150 जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 950 कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे 6 कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे.

लॉकडाउमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी जीव पणाला लावून काम केले आहे. विशेषतः नाकाबंदी, जनजागृती, पेट्रोलिंग, सामाजिक प्रबोधन, गणेशोत्सव तयारी, बेशिस्तावरील कारवाई, दंडात्मक वसुलीला गती दिली होती. त्याचदरम्यान विविध भागात कर्तव्य बजावत असताना अनेकांचा कोरोनाबाधितांशी संपर्क आला होता. परिणामी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे. मागील सहा महिन्यात विविध पोलीस ठाण्यातंर्गत काम करणाऱ्या तब्बल 1 हजार 150 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आधीच मनुष्यबळ कमी असलेल्या पोलीस ठाण्यांना मोजक्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखावी लागत आहे.

कोरोनाबाधित संबंधित पोलिसांवर तातडीने उपचारासाठी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत 950 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात करुन ड्युटीला प्राधान्य दिले आहे. उर्वरित 200 कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत शहर पोलिस दलातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवत अनेक कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस कामाला प्राधान्य दिल्यामुळे पुणेकरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

कोरानामुक्तीनंतर लगेचच ड्युटीला प्राधान्य
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोरोनामुक्त झाल्यानंतर बहुतांश पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ड्युटीला प्राधान्य दिले आहे. त्याशिवाय अनेकांनी प्लाझ्मादान करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह अतिरिक्त कामाचा ताण असतानाही कर्मचारी दिवसरात्र ड्युटी करीत असल्यामुळे नागरिकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या