अकरावी ऑनलाइन प्रवेश 30 ऑगस्टला; पहिली गुणवत्ता यादी

460

शिक्षण संचालनालयाने अखेर सोमवारी अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे पहिल्या गुणवत्ता यादीपर्यतचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी 30 ऑगस्टला जाहीर होणार आहे. त्याआधी 12 ऑगस्टपासून अल्पसंख्यांक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेश आणि पहिल्या गुणवत्ता यादीसाठी काॅलेज पसंतीक्रम भरण्यास सुरूवात होणार आहे. या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रासाठी लागू असणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर केले. सध्या केवळ पहिल्या गुणवत्ता यादीपर्यतचे वेळापत्रक वेबसाईटवर उपलब्ध असून पुढील नियमित दोन प्रवेशफेर्या तसेच विशेष फेऱयांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

अशी असेल प्रवेशप्रक्रिया

  • 12 ते 22 ऑगस्ट – पहिल्या गुणवत्ता यादीसाठी काॅलेज पसंतीक्रम नोंदविणे, कोटय़ांतंर्गत प्रवेश, कोटय़ातील शिल्लक जागा ऑनलाइनसाठी उपलब्ध करणे.
  • 23 ते 25 ऑगस्ट – संभाव्य गुणवत्ता यादी जाहीर, यादीवर हरकती, आक्षेप नोंदविणे.
  • 30 ऑगस्ट – पहिली गुणवत्ता यादी जाहीर,
  • 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर – संबंधित काॅलेजमध्ये ऑनलाइन प्रवेश घेणे.
  • 3 सप्टेंबर – पहिल्या फेरीतील प्रवेश ऑनलाइन नोंदविणे

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील यादीत संधी नाही

पहिल्या गुणवत्ता यादीत तसेच अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोटय़ाद्वारे ज्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे अशा विद्यार्थ्यांना या पुढे जाहीर होणाऱया कोणत्याही फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही. या विद्यार्थ्याचे अर्ज पुढील फेऱयांसाठी बाजूला ठेवले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा घेतलेला प्रवेश रद्द करताना खबरदारी बाळगावी, अशी सूचना शिक्षण संचालकांनी केली आहे.

  • प्रथम पसंतीचे काॅलेज मिळूनही विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास पुढील प्रवेशात संधी नाही. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यत थांबावे लागणार आहे.
  • द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश नियमित फेऱया संपल्यानंतर काॅलेजस्तरावर होतील.
आपली प्रतिक्रिया द्या