फ्रीजमधून बाहेर आला १२ फुटी अजगर

सामना ऑनलाईन । केप टाऊन
केप टाऊन शहरातील स्पाप सुपर मार्केटच्या कोल्ड स्टोरेजमध्ये जायला सध्या कोणी धजावत नाही. ग्राहकांनी तर इथे येणच बंद केले आहे. पण मॅनेजरही ‘गॉड’चं नाव घेतं दररोज कोल्डस्टोरेज उघडतो. न जाणो कुठल्या पदार्थाखाली तो लपला असेल अशी भीती त्याच्याही मनात घर करुन बसली आहे. जो-तो घाबरत आहे आणि त्याचं कारणही तसेच आहे.
काही दिवसांपूर्वी एक महिला सुपर मार्केटमध्ये दही घेण्यासाठी आली होती. दही घेण्यासाठी ती कोल्ड स्टोरेजमध्ये गेली. काचेतून तीला एका फ्रिजरमध्ये दह्याचे डबे रांगेत ठेवलेले दिसले. फ्रिजरचे दार उघडताच भीतीने महिलेची जीभच टाळूला चिकटली आणि क्षणाचाही विलंब न करता तिने तिथून धूम ठोकली. महिलेची अवस्था बघून स्टोअरमधील इतर लोकही सावध झाले. त्यातील एकाने धाडस करुन फ्रिजरचा दरवाजा उघडला आणि त्याची पाचावर धारण बसली. दह्यांच्या डब्यामागे एक अजस्त्र अजगर निवांतपणे पहुडलेला त्याला दिसला. स्टोअरमध्ये अजगर आल्याचे कळताच मॅनेजरने ताबडतोब पोलिस व सर्पमित्रांना बोलावले. त्यानंतर ग्राहकांना स्टोअरमधून सुखरुपणे बाहेर काढण्यात आले.
एव्हाना सुपर मार्केटमध्ये सर्पराज आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांनी आाणि प्रसारमाध्यमांनी गर्दी केली. पण बाहेर हा सगळा गोंधळ सुरु असताना फ्रिजरमध्ये अजगर मात्र शांतपणे झोपला होता. सर्प मित्रांनी त्याला उठवण्यासाठी फ्रिजरच हलवण्यास सुरुवात केली.पण तरीही तो बधला नाही.उलट डोळे किलकिले करुन तो आजूबाजूला काय चाललयं याचा अंदाज घेत होता. अजगर जागेवरुन हलत नसल्याचे बघून सर्पमित्रांनी त्याला काठी टोचून उठवले. त्याने हालचाल करताच मोठ्या शिताफिने सर्पमित्राने त्याचे तोंड काठीत पकडले आणि त्याला बाहेर खेचले. तेव्हा तो बारा फूट लांब असल्याचे समजले. या दरम्यान मिडियाने सुपर मार्केटमध्ये एन्ट्री मिळवून अजगराला पकडतानाचे व्हिडिओ प्रसिध्द केले होते.
कोल्डस्टोरेजमध्ये आराम करण्यासाठी आलेला अजगर आफ्रिकेतील जंगलात आढळणाऱ्या सर्वात लांब सापाच्या प्रजातीचे होते. सुपर मार्केट शेजारी असलेल्या जंगल परिसरातूनच तो नाला अथवा खिडकीतून  कोल्ड स्टोरेजमध्ये आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या