आईशी भांडण झालं म्हणून मुलगा बालीला पळाला

124

सामना ऑनलाईन । सिडनी

एखाद्या गोष्टीवरून आई-वडील रागावले किंवा मग त्यांच्याशी वाद झाला की बऱ्याचदा मुलं काही वेळ रुसून बसतात. तर काही जण थोडा वेळ घरापासून लांब राहतात. मात्र आईशी भांडण झालं म्हणून ऑस्ट्रेलियातील एका १२ वर्षाच्या मुलाने घर सोडून थेट दुसरा देश गाठला आहे. इंडोनेशियातील बाली येथे जाण्यासाठी त्याने पालकांचं क्रेडिट कार्ड चोरले आणि विमानाने प्रवास करत तो बालीला पोहचला. एका आलिशान हॉटेलमध्ये त्याने चार दिवस आरामात घालवल्यानंतर त्याचा शोध लागला आहे.

ऑस्ट्रेलियातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलाला कोणत्याही बाबतीत नाही हा शब्द ऐकण्याची सवय नव्हती. अशाच एका गोष्टीवरून आईचा मुलाशी वाद झाला. त्यामुळे मुलगा सिडनीतील त्याच घर सोडून थेट बालीला पोहचला. या घटनेने आपण अत्यंत अस्वस्थ झालो आहोत’ अशी प्रतिक्रिया मुलाच्या आईने दिली आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर मुलाला विचारले असता त्याने ‘मला या ट्रीपची मजा आली, मला काहीतरी साहसी करायचे होते जे मी करून दाखवले’ असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

१२ वर्षीय मुलाचे आपल्या आईसोबत भांडण झाले होते. त्यानंतर त्याने घरातून पळून जाण्याचा विचार केला. मुलाने आपल्या आजीशी गोड बोलून आपला पासपोर्ट मिळवला आणि शाळेत जात असल्याच सांगितलं. तसेच त्याने इंटरनेटवरही बालीला जाण्यासाठी कोणत्या एअरलाइन्सला आई वडिलांची सही असलेले पत्र लागणार नाही याचीही त्याने आधीच माहिती काढली होती. सिडनी एअरपोर्टला त्याला ओळखपत्राबाबत विचारणा करण्यात आली. तिथे त्याने ते दाखवले आणि माध्यमिक शाळेत शिकत असल्याचं सांगितलं.

मुलगा शाळेतून घरी आला नसल्याने त्याच्या आईने पोलिसात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तसेच पोलिसही त्याचा शोध घेत होते. आई-वडीलांना मुलगा कुठे आहे याची काळजी लागलेली असताना मुलगा मात्र बालीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये राहत होता. खर्चासाठी त्याने घरातून पळून जाताना पालकांचं क्रेडिट कार्ड चोरले होते. ते खर्चासाठी वापरले असता खर्चाच्या तपशीलांवरून या मुलाचा शोध लागला आणि तो बालीला पळून गेल्याची माहिती मिळाली. त्याला घरी आणण्यात आले असून मुलाच्या या कृतीने त्यांच्या आई वडिलांना चांगलाच धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या