अॅपल आणि सॅमसंगला दंडाची शिक्षा

19

>>स्पायडरमॅन

तुम्ही एका नावाजलेल्या कंपनीचा महागडा ब्रँडेड फोन खरेदी करता आणि त्यानंतर ती नावाजलेली कंपनीच अपडेट्स देण्याच्या बहाण्याने तुमच्या फोनमधील फंक्शन्स स्लो करते. नाही, ही कोणती कथा वगैरे नाही, तर सत्यघटना आहे, आणि अनेकांचा अजूनही त्यावर विश्वास बसलेला नाही. इटलीच्या एका आयोगाने सॅमसंग आणि अॅपलसारख्या दोन दिग्गज मोबाईल उत्पादक कंपन्यांवर ग्राहकांचे फोन हेतुपुरस्सर स्लो करणे या गुन्ह्याखाली ही कारवाई केलेली आहे. अॅपलला आणि सॅमसंगला मिळून 126 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी अॅपलला 84 कोटी आणि सॅमसंगला 42 करोडचा दंड झालेला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार या दोन्ही कंपन्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून हा गुन्हा केलेला आहे. आपल्या जुन्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम ग्राहकाने अपडेट केल्यानंतर त्याच्या फोनचा स्पीड आपोआप कमी होईल आणि ग्राहक वैतागून नवा फोन घेईल असा यामागचा कंपन्यांचा डाव होता. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीत आणि फायद्यात जोमाने वाढ झाली असती. इटलीच्या प्रतिस्पर्धा आयोगाने या दोन्ही कंपन्यांनी सॉफ्टवेअर अपडेटच्या बहाण्याने जाणूनबुजून ग्राहकांचे फोन स्लो केल्याचा स्पष्ट आरोप या दोन्ही कंपन्यांवर लावून ही कृती म्हणजे व्यापारी नीतीचा भंग असल्याचे स्पष्ट केले आहे. सॅमसंगने आपल्या गॅलॅक्सी नोट 7 च्या विक्रीसाठी आणि अॅपलने आपल्या आयफोन 7 च्या विक्रीसाठी हे सगळे कांड रचल्याचे उघड झाले आहे. अॅपलने आपल्या आयफोन 6 च्या ग्राहकांना वारंवार सॉफ्टवेअर अपडेटची नोटिफिकेशन्स पाठवली आणि या अपडेटनंतर ग्राहकांचे फोन्स स्लो झाले. या अपडेटनंतर ग्राहकांचे फोन स्लो होतील अथवा त्यातले काही फंक्शन काम करणे बंद करतील अशी कोणतीही कल्पना दोन्ही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना दिली नव्हती. याच प्रकारे सॅमसंगनेदेखील आपल्या गॅलॅक्सी नोट वापरणाऱ्या ग्राहकांची फसवणूक केली आहे. गॅलॅक्सी नोटच्या ग्राहकांना तर सिस्टीमच अपडेट करण्याची नोटिफिकेशन्स पाठवण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या