कॉपीमुक्त अभियानाचा मराठवाड्यात बोजवारा

15
फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याची मोहीम पुरती फसली असून, आतापर्यंतच्या परीक्षेत बारावीमध्ये २०५ आणि दहावीच्या परीक्षेत ७९ विद्यार्थ्यांना पकडल्याची अधिकृत माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. जालना जिल्ह्यातील एका परीक्षा क्रेंद्रावर तर सामूहिक कॉपी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संभाजीनगर विभागीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. १ लाख ६३ हजार ८१७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून प्रारंभ झाला असून, या परीक्षेसाठी १ लाख ९७ हजार ४३६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाबरोबरच महसूल यंत्रणेने कंबर कसली होती. मात्र त्यांच्या या प्रयत्नाला यश आले नाही, पकडलेल्या कॉपीबहाद्दरांच्या संख्येवरून स्पष्ट होते. यावरून संभाजीनगर विभागात कॉपीमुक्तीचा बोजवारा उडाला आहे.

आज, शनिवारी दहावीचा बिजगणिताचा पेपर होता. या पेपरला बीड जिल्ह्यात १३ जणांना पथकाने पकडले आहे. विभागात आतापर्यंत ७९ कॉपीबहाद्दर पकडले असून, सर्वाधिक ३४ कॉपीबहाद्दर बीड जिल्ह्यात पकडले आहेत. त्यापाठोपाठ परभणी -२७, जालना -९, संभाजीनगरमध्ये ८ आणि हिंगोली जिल्ह्यात एका कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत २०५ कॉपीबहाद्दर पकडले आहेत. सर्वाधिक १०५ प्रकरणे बीड जिल्ह्यातील आहेत. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्याचा कॉप्या करण्यात क्रम लागतो. या जिल्ह्यात ५० कॉप्या पकडल्या आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात ३५, हिंगोली-८ आणि जालना जिल्ह्यात ७ कॉपीबहाद्दर पकडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नाला कॉपीबहाद्दरांनी सुरुंग लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या