बुलढाणा : मलकापुरात भीषण अपघात, 13 जण जागीच ठार

सामना ऑनलाईन । मलकापूर

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरजवळ झालेल्या भीषण अपघात 13 जण जागीच ठार झाले असून 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रक प्रवासी वाहतूक करणाऱ्या महिंद्रा मॅक्झीमो गाडीवर धडकली. सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महार्गावरील धरणगाव नजीक रसोया कंपनी समोर हा अपघात झाला.

मलकापूर येथून अनुराबाद-झोडगाकडे प्रवासी वाहतूक करणार्‍या महिंद्रा मॅक्झीमो गाडीने 15 प्रवासी निघाले होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक थेट महिंद्रा मॅक्झीमो गाडीवर चढला. या अपघातात टाटा मॅक्स वाहनात असलेल्या 16 जणांपैकी 13 जण जाग्यावरच ठार झाले. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये महिला, पुरूषांसह लहान मुलांचाही समावेश आहे.

अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळदेखील रुग्णवाहिका व क्रेन घेऊन अपघातस्थळी पोहोचले. उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीष बोबडे, शहर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड आणि नागरिकांच्या सहकार्याने ट्रक खाली दबलेल्या मँक्सीमोतील तिघा जखमींना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले.

अपघातामध्ये अनिल ढगे (40), किसन बोराडे (42), नथ्थु चौधरी (40), छाया खडसे (40), प्रकाश भारंबे (40), मेघा भारंबे(35), सोमीबाई शिवडतकर (26), सतिश शिवडतकर (3), विरेन भिलवतकर (7), मिनाबाई बिलोरकर, आरती, रेखा यांचा समावेश आहे. यातील अनेकजण अनुराबादचे रहिवासी असून, काहीजण जामनेर तसेच मध्यप्रदेशातील नागझीरीचे रहिवासी आहेत.