महाराष्ट्रावर वीज कोसळली, १३ बळी

30

सामना प्रतिनिधी । मुंबई

अखेर राज्यात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने केली. कोकणनंतर कोल्हापुरात मान्सूनचे आगमन झाले. पहिल्याच पावसाने राज्याला झोडपले, भिजवले असे काही घडले नसले तरी वीज कोसळून आणि विजेच्या धक्क्याने मात्र १३ जणांचा बळी घेतला. गडचिरोलीत ४, लातूरमध्ये २, रायगडमध्ये ३ तर नाशकात तिघांचा आणि चंद्रपुरात एकाचा या ‘विजे’मुळे मृत्यू झाला. पाऊस राज्यात बरसत असला तरी मुंबईत मात्र त्याची ‘एण्ट्री’ ४८ तासांत होईल असे हवामान खात्याने सांगितले.

नांदगावच्या कसाबखेडा शिवारात रामदास पोपट राठोड हे ३०वर्षीय शेतकरी मक्याची पेरणी करीत होते. दुपारी दीडच्या सुमारास वीज कोसळली. रामदास यांच्यासह भाऊ अरुण (२२) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रामदास यांना तपासून मृत घोषित केले.
दुसरी घटना सिन्नर तालुक्यातील चोंढी शिवारात घडली. रघुनाथ मवाळ व कुटुंबीय शेतातील गवत काढत असताना विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वीज अंगावर कोसळल्याने रघुनाथ कोंडाजी मवाळ (४५), मुलगा मयूर (१७) हे जागीच ठार झाले तर त्यांचा पुतण्या प्रशांत (२८) हा जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गडचिरोलीत ५ जणांचा मृत्यू, ८ जखमी
गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यात धन्नूर गावात वीज पडून ५ जणांचा मृत्यू झाला. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. गावात लग्नासाठी गेलेले वऱ्हाडी परतत असताना वादळीवाऱ्यासह पाऊस आला. पावसापासून वाचण्यासाठी सर्वांनी झाडाचा आसरा घेतला पण वीज अंगावर पडल्याने ५ जणांचा भाजून मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. लातूरमध्येही वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला.

रत्नागिरीला झोडपले
आज दिवसभर पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अंबा घाट येथे आज सकाळी ६.५० वाजता दरड कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. शिरगाव येथे एका घरावर झाड पडून मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी शहरातील चर्चरोड येथील रस्ता पावसामुळे खचला आहे. रत्नागिरी जिह्यात गेल्या २४ तासांत ६७८.४० मि.मी. पाऊस पडला.

प्रतापगडावरील ध्वज बुरुजाखालील दरड कोसळली
महाबळेश्वर परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडावरील ध्वज बुरुजाखालील दरड आज पहाटे कोसळली. प्रतापगडाच्या मुख्य ध्वज बुरुजाखालील दरड कोसळल्यामुळे मोठमोठे दगड, माती खाली आली. तटबंदी व बुरुजाखालील दरड कोसळण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे गडाच्या तटबंदीखालच्या भागातील दरड मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंचा संपर्क तुटला होता. दरम्यान, प्रतापगडावरील ध्वज बुरुजाखालील दरड पडली असून कोणतीही तटबंदी कोसळली नाही. यासंदर्भात सोशल मीडियातून चुकीचे संदेश दिले जात आहेत. अशा अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी केले आहे.

मंगळवेढा शिवारातील श्री संत दामाजी कारखाना परिसरात असणाऱ्या दत्तू-कदम वस्तीजवळील एका झाडावर वीज कोसळल्याने झाडाखाली थांबलेल्या ५८ मेंढ्य़ा व १२ शेळ्य़ा मृत्युमुखी पडल्या. मेंढपाळ घटनास्थळापासून दूर थांबल्याने ते बालंबाल बचावले आहेत.

img-20170610-wa0225

पुढील ४८ तासांत
मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्य़ातील काही भाग आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांत वाऱयांचा वेग ताशी 60 किलोमीटर होईल. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

पनवेल, मुरबाडमध्ये तीन ठार
पनवेल, मुरबाड – पहिल्या पावसात विजेचा झटका बसून पनवेल, मुरबाडमध्ये तिघांचे बळी गेले. पनवेलमध्ये दोन तर मुरबाडमध्ये एका आयटी इंजिनीअर तरुणाचा मृत्यू झाला. मुरबाडमध्ये विजेच्या तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. पहिल्या पावसाने त्या तुटून पडू लागल्या आहेत. शुक्रवारी रात्री कामावरून म्हसा येथील आयटी इंजिनीअर योगेश कुर्ले (२८) हा मोटरसायकलवरून घरी निघाला असता पोलवरची तार तुटून ती योगेशच्या अंगावर पडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र चंद्रकांत गंभीर जखमी झाला. दुसऱ्या घटनेत तळोजा पाचनंद येथे पावसामुळे निवारा शोधण्यासाठी अब्दुल रज्जाक (५२), बशीद तिदारे (२०) हे विजेच्या पोलजवळ उभे राहिले, त्यावेळी त्यांना जोरदार झटका बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

योगेश कुर्ले
योगेश कुर्ले

शनिवारचा पाऊस (मिमी)
मुंबई- ३१.४
ठाणे- ४३.९
रायगड- ५३.६
सिंधुदुर्ग- ४९.२
उपनगर- २०.२
पालघर- ५७.४
रत्नागिरी- ११६
पनवेल- १०८
गोवा- ५४.६

आपली प्रतिक्रिया द्या