१३ वर्षांच्या मुलाला ब्लॅकमेल करून साडेसात लाखांचा ऐवज लुबाडला

187

सामना प्रतिनिधी । पुणे

तेरा वर्षांच्या मुलाला सिगारेट पिण्यास सांगून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते चित्रीकरण घरी दाखविण्याची आणि सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करण्याची धमकी देऊन तब्बल सात लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज हडपल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी बिबवेवाडीत सोने विकत घेणाऱ्या सोनारासह दोघांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दागिने विकत घेणारा सोनार रेवणसिद्ध शीलवंत (वय ४५, रा. गंगानगर, फुरसुंगी) आणि आदित्य वांद्रे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या संदर्भात १३ वर्षांच्या मुलाच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अल्पवयीन मुलाचे वडील वसतिगृहचालक आहेत. त्यांना दोन मुले, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा १७ वर्षांचा असून, तो सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत आहे; तर लहान मुलगा आठवीमध्ये शिकतो. १८ जानेवारी रोजी नातेवाईकांकडे बारशाचा कार्यक्रम होता. त्या निमित्ताने फिर्यादीच्या पत्नीने आणि आईने पोटमाळ्यावरील कपाटात दागिने ठेवले होते. मात्र, कपाटात दागिन्यांचा शोध घेऊनही ते मिळाले नाहीत. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी घरातील सदस्यांना विचारणा केली, तेव्हा छोटा मुलगा घाबरून रडू लागला. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी व वांद्रेने त्याला सिगारेट पिण्यास शिकविले. सिगारेट पित असताना मोबाइलवर तिघांनी त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. सिगारेट पितानाचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करू किंवा केलेले चित्रीकरण तुझ्या वडिलांना दाखवू, अशी धमकी दिली. त्याला त्यांनी मारहाणही केली. त्यामुळे भीतीपोटी १४ ऑक्टोबर २०१७ रोजी दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्यापासून मुलाने फिर्यादीच्या खिशातून पैसे घेऊन ते आणि दागिने मुलांना दिल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये दागिने आणि ८ हजारांची रोकड असा तब्बल ७ लाख ५५ हजारांचा ऐवज मुलाने त्याच्या मित्रांना दिला. हा ऐवज आदित्य वांद्रे याने सोनार शिलवंतला विकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या