या गेममुळे १३० जणांनी केली आत्महत्या?

17

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या वर्षी पोकेमॉन गो या खेळाने नेटजगतात धुमाकूळ घातला होता. या गेममुळे अनेकजण अडचणीत सापडले तर काहीजणांचे जीवही गेले. मात्र, अजून एक गेम असा आहे जो लोकांचा जीव घेतोय. ब्लू व्हेल नामक हा गेम आजवरचा सर्वात घातक गेम ठरला आहे. सूत्रांनुसार या गेमने १३० जणांचे बळी घेतले आहेत. हा गेम खेळणारी मुलं डिप्रेशनची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे.

हा गेम सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळला जातो. गेम सुरू झाल्यानंतर खेळाडूला एक मास्टर मिळतो. हा मास्टर पुढील ५० दिवस खेळाडू किंवा युजरला नियंत्रित करतो. मास्टरतर्फे रोज नवीन टास्क दिले जातात, जे पूर्ण करणं अपेक्षित असतं. यातील बहुतांश टास्क हे खेळाडूला नुकसान होईल अशा प्रकारचे असतात. उदा. स्वतःच्या रक्ताने ब्लूव्हेल बनवणं, दिवसेंदिवस भयपट बघणं आणि रात्री न झोपणं. अशा प्रकारचे टास्क वारंवार केल्यामुळे हा गेम खेळणारी मुलं मानसिक संतुलन गमावून बसत आहेत.

गेल्यावर्षी पोकेमॉन गो या वास्तव आणि आभासी जगाशी जोडलेल्या गेममुळे अनेकजण संकटात सापडले होते. आभासी जगातले पोकेमॉन पकडण्याच्या प्रयत्नात कित्येकजण वास्तव जगात अडचणीत आले होते. आता, या नवीन गेममुळे आंतरराष्ट्रीय गेमविश्वात खळबळ माजली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या